मालेगाव बाह्य : ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा चौकार | Election Results 2019

dada bhuse 4.jpg
dada bhuse 4.jpg

मालेगाव : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवून शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी इतिहास घडविला आहे. या मतदारसंघात आजवर कोणीही चार निवडणुकांमध्ये विजय मिळविला नव्हता. त्यामुळे भुसे विक्रमादित्य ठरले आहेत. त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाइं महाआघाडीचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांचा पराभव केला. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मताधिक्‍यात वाढ झाली. चौकार लगावताना ते 48 हजारांपेक्षा अधिक मताधिक्‍याने विजयी झाले. जिल्ह्यात शिवसेनेची पीछेहाट झाली असताना भुसेंचा विजय मात्र लक्षणीय आहे. 

भुसेंची आव्हानात्मक लढत 

भुसे यांच्याविरोधात महाआघाडीचे सर्व विरोधक एकवटल्याने या निवडणुकीत त्यांना आव्हान असेल असे बोलले जात होते. भुसे यांनी हे आव्हान लीलया पेलले. त्यांच्या विजयामुळे शिवसेना-भाजप युतीचे मालेगाव तालुक्‍यातील वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सन 2004 च्या निवडणुकीत माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा पराभव करून राजकारणाचा श्रीगणेशा केला. यानंतर सन 2009 च्या निवडणुकीत त्यांना 30 हजारांहून अधिक मताधिक्‍य मिळविले. श्री. भुसे यांनी 2014 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पवन ठाकरे यांचा 37 हजार 421 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत त्यांना फारसे आव्हान नव्हते. विरोधकांनी सर्वसंमतीने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत निवडणूक प्रचारात रंग भरला. मतदानाला तीन दिवस बाकी असतानाच आघाडीचे आव्हान संपुष्टात आले. अखेरच्या दोन दिवसांत श्री. भुसे यांनी तालुक्‍यातील मोठी गावे व शहरात प्रचारात आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले होते. डॉ. शेवाळे यांनी भुसेंना चांगली लढत दिली. आघाडीच्या उमेदवारासह नेत्यांनी अंतिम टप्प्यात कच खाल्ल्याने त्याचा लाभ महायुतीने उठविला. 

* माजी विरोधी पक्षनेते निहाल अहमद यांच्यापाठोपाठ सलग चौथ्यांदा निवडून येणारे दादा भुसे यांचा मोठा विजय. 
* भाजप-शिवसेना युतीचा दादा भुसेंना लाभ 
* युतीमुळे विक्रमी मताधिक्‍याला हातभार 
* भाजप-रिपाइं व मित्रपक्षांची प्रामाणिक मदत 
* गेल्या पंधरा वर्षांतील विकासकामे, जनसंपर्क व कार्यकर्त्यांच्या बळावर विजय साकारला 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com