मंत्र्यांचे ट्विटर युद्ध राज्यासाठी घातक - दिलीप वळसे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे सोशल मीडियावर सुरू असलेले ‘ट्विटर वॉर’ राज्याच्या जनतेच्या परवडणारे नाही, ते घातक आहे, असे स्पष्ट मत राज्याच्या विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील यांनी केले. जळगावात ते पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हानिहाय तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बैठका सुरू आहेत.

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे सोशल मीडियावर सुरू असलेले ‘ट्विटर वॉर’ राज्याच्या जनतेच्या परवडणारे नाही, ते घातक आहे, असे स्पष्ट मत राज्याच्या विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील यांनी केले. जळगावात ते पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हानिहाय तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बैठका सुरू आहेत. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार अरूणभाई गुजराथी होते. तर जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील, माजी आमदार हरिभाऊ महाजन,माजी आमदार साहेबराव पाटील अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विजयाताई पाटील, कल्पना पाटील, मंगला पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, की राज्यातील जिल्हा बॅंकांना पाण्यात पाहणारे राज्य शासन बॅंकांना कोट्यवधी रुपयांना बुडवून विदेशात पलायन करणाऱ्या मोठ्या उद्योगपतींबाबत मात्र गप्प आहे. विजय मल्ल्या कोट्यवधी रूपये बुडवून पळून गेला. त्याच्या बाबतीत शासनाने अद्यापही कारवाई केलेली नाही.
 
मुख्यमंत्र्यांचे विरोधक कार्यकर्ते
राज्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानी मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन केल्याबाबत ते म्हणाले की, त्यांच्याच पक्षातील  मंत्र्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करतात. राज्याच्या राजकारणात हा प्रकार नवीनच आहे. त्यामुळे राज्यातील शासनात नेमके काय सुरू आहे हेच कळत नाही. त्यांच्या पक्षातील नेते आपसांत लढत आहेत. जळगाव जिल्ह्यातही भाजपचे कार्यकर्ते आपसांत लढत आहे. त्यातून आम्ही फायदा होईल याचा आम्ही विचार करीत नाही. परंतु राज्यातील हे चित्र बरोबर नाही.

कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे
आगामी जिल्हा परिषद व पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले, ते म्हणाले, की पक्ष कार्यकर्त्यांनी केवळ हवेत गोळ्या मारू नये तर प्रत्यक्ष काम करावे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पक्षाच्या कार्यासाठी पदाधिकाऱ्यांना वेळ द्यावा लागेल. वेळ नसेल तर पदाधिकाऱ्यांनी केवल पदे घेऊन त्यांनी पदे सोडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उमेदवारी अर्ज मागविले जाणार नाही तर कार्यकर्त्यांची संगणकावर असलेल्या माहितीच्या आधारावर त्यांना उमेदवारी देण्यात येईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली माहिती त्वरित भरून पाठवावी असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Minister of State for War hazardous Twitter : Dilip Valse-Patil