नाशिक : 'त्या' जवानाची आत्महत्या; तोफखाना केंद्रातील घटना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सुरक्षा व्यवस्थेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत देशात ठिकठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोंबाबोंब झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

नाशिक : नाशिक रोड तोफखाना केंद्रातील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपासून तणावातून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केरळमधील कोलम (मूळ गाव) येथे दाखल केली होती. त्यामुळे बेपत्ता होण्यापूर्वी त्याचे कुटुंबीयांशी काही बोलणे झाले होते का, असाही प्रश्‍न पुढे आला आहे.

जवानाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. त्याच्याकडे एक डायरी मिळाली आहे. मात्र, त्यातील मजकूर मल्याळम भाषेत असल्याने त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. देवळाली कॅम्प येथील लष्करी रुग्णालयात उत्तरीय तपासणी सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, चार-पाच दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्यामुळे तेव्हाच कधी तरी आत्महत्या केली असावी. मृतदेह चांगल्या अवस्थेत नसल्याचे पुढे आले आहे.

हा जवान मूळचा केरळमधील कोलम येथील रहिवासी असून, डी. एस. रॉय मॅथ्यूस (वय 33) असे त्याचे नाव आहे. सैनिकी क्रमांकावरून त्याची ओळख पटली. केरळमधून त्याचे वडील, पत्नी नाशिकला दाखल झाले आहेत. लष्करी प्रशासनाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाबाबत स्थानिक पोलिसांनीही मौन बाळगले आहे. काही दिवसांपासून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांपासून तर लष्करातील विविध सुरक्षा यंत्रणेतील जवानांत खात्यांतर्गत दहशतीच्या चर्चा सोशल मीडियातून रंगत आहेत.

सुरक्षा व्यवस्थेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत देशात ठिकठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोंबाबोंब झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. वर्दीच्या आतील दडपशाहीबाबत लष्करातही काही तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे काहीशा तशाच प्रकारामुळे आलेल्या तणावातून या जवानाने आत्महत्या केली की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे. लष्करी यंत्रणाही याबाबत मौन बाळगून आहे.

Web Title: missing jawan committed suicide at nashik ammunition factory