शासकीय विश्रामगृहाचा होतोय गैरवापर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

चाळीसगाव - येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोल्या विना परवानगीने स्थानिक कर्मचारी परस्पर देत असल्याने या विश्रामगृहाचा गैरवापर होत आहे. सध्या निवडणुकांमुळे या विश्रामगृहाचा कारभार प्रांताधिकाऱ्यांकडे असल्याचे कारण सांगून स्थानिक कर्मचारी जास्तीचे पैसे आकारत आहेत.

विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले जाते. त्यामुळे या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

येथील शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यत्यारित येते. या ठिकाणी एकूण पाच खोल्या आहेत. या खोल्यांचे अधिकृत बुकिंग झालेले नसल्यास, येथील काही स्थानिक कर्मचारी या खोल्या परस्पर पैसे घेऊन सर्रास राहण्यासाठी देतात. काही खोल्यांमध्ये अनेक जण दुपारच्यावेळी अनधिकृतरीत्या झोपलेले असतात. विश्रामगृहाच्या आवारात दारूच्या बाटल्याही फेकलेल्या असतात. त्यामुळे या विश्रामगृहात ओल्या पार्ट्या तर रंगत नसतील? असा प्रश्‍न उपस्थित होते. वास्तविक, शासकीय विश्रामगृहात राहण्याची अधिकृत परवानगी असेल तरच ते दिले जाते.

येथील विश्रामगृह मात्र, ‘आओ जाओ घर तुम्हाला’ असे झाले आहे. या विश्रामगृहाची एक दिवसांची परवानगी घेऊन त्याचा वापर करणाऱ्यांकडून स्थानिक कर्मचाऱ्याने दोन दिवसांचे भाडे आकारले. त्याची पावती मागितल्यानंतर ती दिली नाही, त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी व विश्रामगृहाचा होत असलेला गैरवापर थांबवावा, अशी मागणी होत आहे. 

खोल्यांची दुर्दशा 
विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो. मात्र, हा सर्वच्या सर्व निधी खर्च केला जात नसल्याचे खोल्यांच्या स्थितीवरून दिसत आहे. दोन मुख्य खोल्यांपैकी एका खोलीतील सोपा, खुर्च्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. खोल्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र घाणच घाण साचली आहे. एखादा वरिष्ठ शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ राजकीय पदाधिकारी अधिकृतरीत्या परवानगी घेऊन मुक्कामी राहणार असेल तर तेवढ्यापुरता तात्पुरती दुरुस्ती व सुशोभीकरण केले जाते. प्राप्त माहितीनुसार, या शासकीय विश्रामगृहातील खोल्यांचा गैरवापर होत असल्याने व स्थानिक कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता टी. पी. सोनवणे यांना विचारले असता, त्यांनी विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामाचे टेंडर काढून दुरुस्ती केली जाते, असे त्यांनी सांगितले. 

विश्रामगृहातील आरामकक्षामधील सोफासेट, दिवाणसह विविध साहित्यांची झालेली दुरवस्था पाहता, येत्या मार्चमध्ये त्याच्या दुरुस्तीसंदर्भात योग्य ती दखल घेतली जाईल. 
- किशोर चव्हाण, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभाग, चाळीसगाव.

Web Title: Misuse of government guest house