आमदार गोटेंचे शिवसेना "पाठिंबास्त्र' 

anil gote
anil gote

धुळे : येथील महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे सरकला आहे. या प्रचारात आक्रमक असलेले लोकसंग्रामचे नेते तथा आमदार अनिल गोटे यांनी ज्या प्रभागात त्यांचे उमेदवार नाहीत तेथे शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करून भाजपवर आपल्या भात्यातील आणखी एक "अस्त्र' उपसले आहे. मात्र, आतापर्यंत संयमी भूमिका बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षावर ते आदळणार की गोटेंवरच "बूमरॅंग' होणार, याबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह आहे. 

भाजप नेत्यांचे "तोंडावर बोट' 
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपचे आमदार अनिल गोटे आक्रमक आहेत. आपल्या पक्षाविरुद्धच त्यांनी रणशिंग फुंकल्याने ही निवडणूक वेगळ्या वळणावर जाणार, हे निश्‍चित झाले होते. आमदार गोटे यांच्या नेहमीच्या निवडणूक प्रचार शैलीप्रमाणे या निवडणुकीतही त्यांनी विरोधक असलेल्या आपल्याच पक्षाविरुद्ध आरोपाच्या तोफा डागल्या. अगदी धुळ्यातील गल्लीपासून तर थेट विधिमंडळाच्या सभागृहापर्यंत त्यांनी भाजप नेते आणि त्यांच्या कार्यावर आरोप केले. या शिवाय स्थानिक स्तरावर "क्‍लीप'अस्त्रही वापरले, त्यामुळे जोरदार खळबळ उडेल, असे वाटले होते. आमदार गोटेंच्या आरोपाला भाजपही तेवढ्याच जोरदारपणे उत्तर देईल, अशी अपेक्षाही होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठांपासून थेट स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांनी "तोंडावर बोट' ठेवले. संरक्षण राज्यमंत्री व पक्षाचे नेते डॉ. सुभाष भामरे यांनी जाहीर सभांतून दिलेल्या उत्तराव्यतिरिक्त भाजपने आरोपांना उत्तर देण्याकडे लक्ष दिलेच नाही. भाजपच्या या "नो-कॉमेंट्‌स' नीतीमुळे गोटेंचे आक्रमक अस्त्र तेवढे फायदेशीर ठरले नसल्याचे चित्र दिसत आहे. 

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र 
राजकीय मैदानात कसलेले आमदार गोटे भाजपला नमविण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. त्यांनी राजकीय खेळातील डाव बदलत थेट भाजपचा सत्तेतील मित्रपक्ष; परंतु राजकारणातील सध्या तरी विरोधक असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी लोकसंग्रामचे उमेदवार नाहीत तेथे त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' असे समीकरण सर्वच क्षेत्रांत असते. त्याला राजकारण तर मुळीच अपवाद नाही. आमदार गोटे यांची हीच राजकीय चाणाक्ष खेळी करून आपल्या भात्यातील एक "अस्त्र' उपसले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात "त्या' प्रभागांत वेगळेच चित्र निर्माण झाले आहे. 

शिवसेनेला आयती संधी 
आमदार गोटेंचा हा पाठिंबा शिवसेनेनेही स्वीकारला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख के. पी. नाईक यांनी या पाठिंब्याचे स्वागतही केले आहे. यामुळे लोकसंग्राम आणि शिवसेना युतीचे मार्गही खुले झाले आहेत. शिवसेनेनेही हाच मार्ग अवंलबून ज्या ठिकाणी आपले उमेदवार नाहीत त्या ठिकाणी आमदार गोटेंच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदाही गोटेंच्या उमेदवारांना होईल. त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसेल. आमदार गोटेंचे अस्त्र भाजपला नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे आता भाजप काय खेळी करणार, याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी चाणक्‍यनीती वापरल्यास गोटेंवर हे "पाठिंबास्त्र' बूमरॅंग होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com