स्वातंत्र्यदिनाचे आंदोलन स्थगित करावे ; आमदार दीपिका चव्हाण यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन गिरणा खोरे प्रकल्प विभागाने दिले आहे. मात्र हे आश्वासन न पाळल्यास (ता. २) सप्टेंबरला नाशिक येथील गिरणा खोरे प्रकल्प कार्यालयासह येथील लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग कार्यालयास आपण टाळे ठोकणार आहोत. त्यामुळे उद्या बुधवार (ता.१५) स्वातंत्र्यदिनी छेडण्यात येणारे आंदोलन लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी येत्या १ सप्टेंबरपर्यंत स्थगित करावे, असे आवाहन बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आज येथे केले.

याबाबत बोलताना आमदार सौ. चव्हाण म्हणाल्या, विविध तांत्रिक व प्रशासकीय अडथळे निर्माण झाल्याने केळझर चारी क्रमांक आठचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. चारीचे प्रलंबित काम मार्गी लागण्यासाठी आघाडी शासनाबरोबरच आताच्या भाजप - सेना शासनाकडेही सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या कामासाठी शासनाची मान्यता मिळालेली असून निधीही मंजूर झाला आहे. मात्र मधल्या काळात काही शेतकऱ्यांच्या आडमुठेपणामुळे कामास खीळ बसली. त्यामुळे कामाची किंमत वाढली. वाढीव किमतीचे काम परवडणार नसल्याचे कारण देत ठेकेदाराने काम सोडले. त्यामुळे पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी आणखी कालावधी लागणार होता. परंतु तसे न होऊ देता मूळ ठेकेदाराची सहमती घेवून काम दुसऱ्या ठेकेदाराकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या नव्या ठेकेदाराकडून येत्या १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे गिरणा खोरे प्रकल्प विभागाने सांगितले आहे.

मात्र १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्यास दुसऱ्याच दिवशी (ता.२) नाशिक येथील गिरणा खोरे प्रकल्प कार्यालयासह सटाणा येथील लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग कार्यालयासही टाळे ठोकण्यात येईल. लाभक्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थांनी संयम राखत उद्या (ता.१५) रोजी स्वातंत्र्यदिनी पुकारलेले आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे. 

केळझर चारी क्रमांक आठचे काम जवळपास वीरगाव (ता.बागलाण) पर्यंत पूर्ण झाले आहे. दरम्यान डोंगरेज शिवारात शेतकरीवर्गाने केलेल्या विरोधामुळे सुमारे एक किलोमीटरपर्यंतचे काम अपूर्ण आहे. मात्र तरीही त्याठिकाणी भूमिगत सिमेंट जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या कामाचीही तरतूद करण्यात आली आहे. मुळाणेपर्यंतचे तीने किलोमीटर पर्यंतचे कामही लवकरच मार्गी लागणार आहे. एवढेच नव्हे तर नवीन वळण योजनांमुळे उपलब्ध झालेले अतिरिक्त पाणी याच चारीच्या वायगावपर्यंतच्या वाढीव कामासाठी आरक्षित करण्यात यावे यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. 
 
Web Title: MLA Deepika Chavan Appeal for movement should be suspended on Independence Day