सटाणा शहर वळण रस्त्यासाठी आमदार दीपिका चव्हाणांची दिल्लीवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

आमदार सौ. चव्हाण यांनी आमदार सुमनताई पाटील यांच्यासह आज श्री. पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली आणि या गंभीर प्रश्नी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक घेण्याबाबत साकडे घातले. यावेळी सौ. चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात, केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा दिल्यानंतर रस्ते विकास महामंडळ (एम.एम.आर.डी.ए.) ने प्रकल्प अहवाल सादर केला.

सटाणा  : शहरातून जाणाऱ्या बहुचर्चित विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गास केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने प्रस्तावित असलेला शहर वळण रस्ता आता दर्जोन्नत झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वळण रस्त्याचे काम थांबविले आहे. केंद्र शासनाने शहराच्या वळण रस्त्याचा प्रस्ताव स्वतंत्रपणे तयार करून हे काम त्वरित मार्गी लावावे, या मागणीसाठी काल मंगळवार (ता.२८) रोजी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. 

आमदार सौ. चव्हाण यांनी आमदार सुमनताई पाटील यांच्यासह आज श्री. पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली आणि या गंभीर प्रश्नी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक घेण्याबाबत साकडे घातले. यावेळी सौ. चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात, केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा दिल्यानंतर रस्ते विकास महामंडळ (एम.एम.आर.डी.ए.) ने प्रकल्प अहवाल सादर केला. त्यानुसार पिंपळनेर ते सटाणा या ४२.५७ किलोमीटर अंतराच्या महामार्गास अंदाजे २४१ कोटी खर्च तर सटाणा ते मंगळूर (चांदवड) या ३७.१४ किलोमीटर अंतराच्या महामार्गास अंदाजे २२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय परिवहन भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या आर्थिक स्थायी समितीच्या मान्यतेसाठी तसेच केंद्रीय वार्षिक अर्थसंकल्पात समाविष्ठ करण्यासाठी या मंत्रालयाकडे हा प्रस्ताव सादर केले आहे. मात्र त्यास अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे त्यास त्वरित मंजुरी मिळून कामास प्रत्यक्ष सुरुवात व्हावी.

हा प्रस्तावित महामार्ग सटाणा शहरातून जात आहे. शहरात अवजड वाहतुकीमुळे अनेक मोठे अपघात झाले असून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे. वाहतूक कोंडी जणूकाही शहरास शाप आहे. महामार्गावर शाळा - महाविद्यालये, बँका, दवाखाने व व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूस सर्व्हेक्षण करून प्रयोगात्मक संरेखना निश्चितीची कार्यवाही पूर्ण केली होती. मात्र आता हा महामार्ग दर्जोन्नत होऊन राष्ट्रीय महामार्गात समाविष्ठ झाल्याने बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही स्थगित केल्याचे सौ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान श्री. पवार यांनी तात्काळ केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या प्रलंबित प्रश्नी त्वरित बैठक बोलवावी आणि प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. श्री. गडकरी यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही आमदार सौ. चव्हाण यांनी व्यक्त केला. 

Web Title: MLA Deepika Chavan work for satana road