
Dhule News : वीज महावितरणसह महापालिकेची खरडपट्टी; काळे फासणे, कुलूप ठोकण्याचा गर्भित इशारा
Dhule News : शहरातील पाणीपुरवठाप्रश्नी महापालिका आणि वीज महावितरण कंपनीत ‘तू- तू, मै- मे’चा चाललेला खेळ, तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारावर संतप्त होत आमदार फारुक शाह यांनी या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बुधवारी (ता. २६) विश्रामगृहात समन्वय बैठक घेतली. (MLA Shah vowed that if pending issues are not resolved electricity authorities will be black handed and municipal corporation will be locked dhule news)
त्यात वीज कंपनी व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी होताच त्यांची आमदार शाह यांनी खरडपट्टी काढली. जनहितासाठी अपेक्षित प्रश्न सोडविले नाहीत, तर वीज अधिकाऱ्यांना काळे फासू, महापालिकेला कुलूप ठोकू, असा सज्जड दम आमदार शाह यांनी भरला.
बैठकीस आमदारांसह मनपा आयुक्त देवीदास टेकाळे, शहर अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत ओगले, प्रदीप चव्हाण, मनपा वीज विभागाचे अधिकारी एन. के. बागूल, वीज महावितरण कंपनीचे प्रभारी अधीक्षक अभियंता भीमराव म्हस्के, कार्यकारी अभियंता आर. एम. पाटील आदी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना सज्जड दम
जलस्त्रोतांमध्ये साठा असूनही धुळे शहरात पाण्याचे संकट उभे राहिले आहे. त्याचे खापर महापालिका ही वीज महावितरण कंपनीवर फोडते आहे. याउलट महावितरण कंपनीने अंग झटकत महापालिकेकडे अंगुलिनिर्देश केले आहे.
त्यामुळे या प्रमुख दोन यंत्रणांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी आमदार शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. तीत महापालिका आणि वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या यंत्रणांनी भांडावे किंवा काहीही करावे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मात्र, २० मेपासून शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा झालाच पाहिजे. अन्यथा, जनआंदोलन छेडून महापालिकेला कुलूप ठोकू, तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काळे फासून खुर्चीला बांधून ठेवू, असा सज्जड दम संतप्त आमदार शाह यांनी अधिकाऱ्यांना दिला.
प्रश्न सोडवला तर ठिक...
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि विस्कळित पाणीपुरवठा या गंभीर प्रश्नांवर शहर अभियंता शिंदे यांनी वीज महावितरण कंपनीकडून वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्याचा परिणाम महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या मुद्यावर हरकत घेत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वारंवार वीजपुरवठा खंडित होत नसल्याचा दावा केला.
त्यामुळे आमदार शाह वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. हा प्रश्न नसेल, तर काही राजकीय पक्षांकडून उगीचच आंदोलने होत आहेत का, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. वीजेशी संबंधित प्रश्नांकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे जलदगतीने कारभार सुधारावा, अन्यथा काळे फासू, असा सज्जड दम आमदार शाह यांना भरावा लागला. महापालिकेकडून धुळेकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. विस्कळित पुरवठ्यामुळे जनता हैराण आहे. त्यामुळेच मनपाने २० मेपर्यंत दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले नाही तर जनआंदोलन छेडू, असा इशाराही आमदार शाह यांनी प्रशासनाला दिला.
वीज उपकेंद्राचा अभाव
शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी वीज उपकेंद्राचा अभाव असल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो, तो सुरळीत ठेवण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. उपकेंद्रासाठी जागा नसल्याने हा प्रश्न उद्भवत आहे, असा मुद्दा पुढे आल्यावर उपकेंद्रासाठी जागा खरेदी करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार शाह यांनी दिले.