नगरसेवकांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा रोष वाढणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नाशिक - महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने बांधणी करताना इतर पक्षातील विद्यमान नगरसेवकांना प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. शिवसेना नेत्यांचा हा प्रयोग बंडखोरीला प्रोत्साहन देणारा ठरण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर डोकेदुखी ठरणारा आहे. सुवर्णा मटाले, शीतल भामरे व गणेश चव्हाण यांच्या आजच्या प्रवेशावरून शिवसेनेत आताच असंतोषाचे वारे वाहू लागले आहेत. नगरसेवकांच्या प्रवेशाने नवी समीकरणे निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चाळीस नगरसेवकांपैकी तब्बल पंचवीस नगरसेवकांनी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजूनही काही नगरसेवक इतर पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आज सिडको विभागातील सुवर्णा मटाले व शीतल भामरे यांना प्रवेश देण्यात आला. मटाले व भामरे दोघीही प्रभाग 28 मधून इच्छुक आहेत. सर्वसाधारण महिला गटातील दोन्ही जागांवर शिवसेनेने त्यांना उमेदवारीचे आश्‍वासन दिले आहे. सर्वसाधारण गटात विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. यापूर्वी माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांच्यासह युवासेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक दातीर दावेदार आहेत. महिलांच्या दोन जागांवर मटाले व भामरे यांच्या नावाची निश्‍चिती झाल्याने उर्वरित इतर मागासवर्गाच्या जागेवर दिलीप किंवा दीपक दातीर या दोघांपैकी एकाला उमेदवारी द्यावी लागणार आहे. तसेच महिला गटातूनही मंदाताई दातीर यांना उमेदवारी हवी असल्याने शिवसेनेला बालेकिल्ल्यात बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. माजी नगरसेवक ऍड. जे. टी. शिंदे आडगाव भागातून शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. काही वर्षात शिवसेनेने या भागात ताकद निर्माण केली. ज्यांनी ताकद निर्माण केली, ते उमेदवारी करण्यासाठी कंबर कसत असतानाच शिंदे यांच्या प्रवेशाने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार होता. परंतु, स्थानिक शिवसैनिकांनी एका लॉन्सवर बैठक घेऊन प्रवेशाला विरोध केला. त्यानंतरही शिंदे यांचा प्रवेश झाल्याने तेथेही शिवसेनेला बंडखोरीची झळ बसण्याची शक्‍यता आहे. एकूणच शिवसेनेत इतर पक्षातील नगरसेवकांना प्रवेश देऊन वातावरणनिर्मिती होत असली तरी निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्या शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू आहे.

Web Title: Mns Corporators enters to Shiv Sena party