कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी मनसेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

बागलाण तालुक्याला गेल्या दीड वर्षांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक शासकीय कामे रखडली आहेत. कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीची वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज बुधवार (ता.४) रोजी तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

सटाणा - बागलाण तालुक्याला गेल्या दीड वर्षांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक शासकीय कामे रखडली आहेत. कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीची वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज बुधवार (ता.4) रोजी तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

मनसेचे शहरप्रमुख पंकज सोनवणे यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले, मात्र पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन मगर व पोलीस कर्मचारी पुंडलिक डंबाळे यांनी सतर्कतेने काही क्षणात आग विझवून मनसेचे आंदोलन हाणून पाडले. यानंतर पोलिसांनी आंदोलक मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनाची शहर व तालुक्यात आज दिवसभर जोरदार चर्चा सुरु असून तहसीलदार नियुक्तीची मागणी जोर धरू लागली आहे. 

बागलाण तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक शासकीय कामे ठप्प झाली आहेत. गेल्या दीड वर्षात तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार दहा अधिकाऱ्यांनी कसाबसा सांभाळला. त्यातच नायब अथवा प्रभारी तहसीलदारांना पूर्ण अधिकार नसल्याने तालुक्यातील विविध शासकीय योजना रखडल्या आहेत. शैक्षणिक वर्षे सुरु होऊनही अनेक विद्यार्थ्यांना विविध दाखले वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व पालकांचे हाल होत आहेत. कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी मनसेने ता. 10 एप्रिल रोजी तहसीलमध्ये गेटबंद आंदोलन छेडले होते. त्यावेळी लवकरच वरिष्ठ पातळीवरून नियुक्तीचे आदेश होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाले होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रत्येक मनसे पदाधिकाऱ्याने स्वतंत्रपणे आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदन तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला दिले होते.

आज सकाळी अकरा वाजता मनसेचे उपजिल्हाप्रमुख मनोज सोनवणे, तालुकाप्रमुख सतीश विसपुते व शहरप्रमुख पंकज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस मंगेश भामरे, विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन सोनवणे, मनसे शहर उपप्रमुख निलेश नंदाळे, हेमंत इंगळे, तालुका उपप्रमुख विश्वास खैरनार, वैभव सोनवणे व अन्य आठ दहा कार्यकर्ते हातात डीझेलच्या डबक्या घेऊन तहसील कार्यालय आवारात अचानक दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'कायमस्वरूपी तहसीलदार मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. यानंतर सटाणा पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

Web Title: MNS movement for permanent Tehsildar appointment