विद्यार्थी सेनेचा तंत्र निकेतन मध्ये सहसंचालकांना घेराव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

एकलहरे (नाशिक) : सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ऑटोमोबाईल विद्यार्थ्यांचे चौथे सेमीस्टर सुरु न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्राचार्य तथा सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांना आज घेराव घातला.

एकलहरे (नाशिक) : सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ऑटोमोबाईल विद्यार्थ्यांचे चौथे सेमीस्टर सुरु न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्राचार्य तथा सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांना आज घेराव घातला.

शासकीय तंत्रनिकेतनमधील कम्युनिटी कॉलेजच्या ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे तीन सेमिस्टर (सत्र) पूर्ण झाले असून चौथ्या सेमीस्टरचे पैसे भरूनही ते सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांपुढे पेचप्रसंग उभा राहिला. वर्ष, मेहनत आणि पैसा वाया जाणार या चिंतेने त्यांना ग्रासले. त्यांनी नाशिकरोड  महाराष्ट्र नव निर्माण विध्यारथी सेनाचे शशी चौधरी, नितीन धानापुणे यांना ही समस्या सांगितली.

मनविसेने दिलेली माहिती अशी, तंत्रनिकेतनमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे पाच स्तर असतात. त्यापैकी तीन स्तर संबंधित विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आहेत. मात्र, चौथ्या स्तरासाठी (इंजिन टेस्टिंग) आवश्यक प्रात्यक्षिक साधनांची सुविधा महाविद्यालयात उपलब्ध नसल्याने खासगी कारखान्यात प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थ्यांना जाणे अपरिहार्य आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाने प्रयत्न करूनही कोणतीही कंपनी इंजिन टेस्टिंगचे 540 तासांचे प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी अनुकूलता दर्शवित नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे यंदाचे2018-2019  हे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. या वर्षीची प्रवेश फी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली आहे. तरीही चौथ्या स्तराचा कोर्स चालू झालेला नाही. लवकरच या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पूर्तता व्यवस्थापन सुरू करेल या अपेक्षेने विद्यार्थी रोज महाविद्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यांना प्रतिसाद दिला जात नाही. ही समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनविसेकडे धाव घेतली.

मनविसेचे नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुणे यांच्या  नेतृत्वाखाली पदाधिका-यांनी सहसंचालक प्रा.ज्ञानदेव नाठे यांना घेराव घातला. त्यांनी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची ग्वाही दिली. या विद्यार्थ्यांना रोजगारासाठीही मदत करण्याचे आश्वासन दिले. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनविसेने दिला आहे. यावेळी मनविसेचे नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुणे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य शशिकांत चौधरी, उमेश भोई, बाजीराव मते नाशिकरोड उपाध्यक्ष सागर दाणी, प्रशांत गायकवाड, प्रशांत बारगळ,लखन कुमावत,हेमंत परदेशी, प्रशांत सुर्यवंशी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, या विषयी अधिक महितीसाठी प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमण ध्वनी बंद असल्याने संपर्क होवू शकला नाही.

Web Title: mns student sena and tantra niketan