नाशिकमध्ये पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई

राजेंद्र बच्छाव
बुधवार, 10 एप्रिल 2019

- शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या पाच संशयितांवर करण्यात आली कारवाई.

इंदिरानगर (नाशिक) : शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या पाच संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी निंयत्रण अधिनियम (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी या संशयितांना विरोधात पाठवलेल्या प्रस्तावाचा पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील त्यांनी स्वीकार केला असून, कारवाई करण्यात आली.

या प्रस्तावांतर्गत विलास राजू मिरजकर (26) रा.तेलंग वस्ती, पेठरोड, पंचवटी, सुनिल रामचंद्र पवार (28) रा. पेठ रोड ,पंचवटी, भीमा उर्फ सतीश नाना पवार (23) धामणगाव तालुका अकोला जि अहमदनगर, किरण उर्फ गोटया रामदास म्हस्के (20) रा. नवनाथ नगर, पंचवटी आणि नारायण उर्फ आप्पा रामदास बसणेत रा. नवनाथ नगर, पंचवटी यांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

यामध्ये खून, खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, हाणामाऱ्या आदी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, बसनेत वगळता इतर चौघे सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर बसणेत हा संशयित सध्या फरारी आहे. या सर्वांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे आणि मोक्का लावण्याची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक पाटील यांनी फेब्रुवारी महिन्यात पोलिस आयुक्तालयात सादर केला होता. त्यातील सर्व बाबी आणि कागदपत्रांची तपासणी करून पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांनी या पाच जणांविरोधात मोक्कांतर्गत कारवाईचे आदेश दिले.

Web Title: MOCCA Action Against Five Criminals in Nashik