मॉडेलिंगच्या शिक्षणासाठी गाठावी लागतेय मुंबई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

नाशिकमध्येही फॅशन डिझाइनचे शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांबरोबरच काही खासगी संस्थाही शहरात फॅशन शो भरवत असतात. त्यामुळे येथील मॉडेलिंग करणाऱ्या तरुणाईला संधी उपलब्ध होत आहे. मात्र असे असले तरी हौस म्हणून येथील स्पर्धा ठीक आहे, व्यावसायिकदृष्ट्या नावलौकिक मिळवायचा असेल तर अजूनही मुंबईच गाठावी लागते. कारण मॉडेलिंगचे शिक्षण देणाऱ्या संस्था येथे उपलब्ध नाहीत. टीव्हीवरच्या मॉडेलचे दिमाखदार रॅम्पवॉक पाहून अनेकांना मॉडेलिंगविषयी भुरळ पडते.

नाशिक - चंदेरी दुनियेचं आकर्षण सर्वांनाच असतं. मग त्याकडे जाणारे मार्ग शोधले जातात. मॉडेलिंगमधून चंदेरी दुनियेकडे तसेच इतर क्षेत्रांतही विविध संधी उपलब्ध असल्याने मॉडेलिंगकडे तरुणाईचा कल वाढला आहे.

नाशिकमध्येही फॅशन डिझाइनचे शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांबरोबरच काही खासगी संस्थाही शहरात फॅशन शो भरवत असतात. त्यामुळे येथील मॉडेलिंग करणाऱ्या तरुणाईला संधी उपलब्ध होत आहे. मात्र असे असले तरी हौस म्हणून येथील स्पर्धा ठीक आहे, व्यावसायिकदृष्ट्या नावलौकिक मिळवायचा असेल तर अजूनही मुंबईच गाठावी लागते. कारण मॉडेलिंगचे शिक्षण देणाऱ्या संस्था येथे उपलब्ध नाहीत. टीव्हीवरच्या मॉडेलचे दिमाखदार रॅम्पवॉक पाहून अनेकांना मॉडेलिंगविषयी भुरळ पडते. फक्त सुंदर चेहऱ्यांनाच यात संधी मिळते किंवा ठराविक वयोगट असेल तरच संधी मिळते असा समज असतो. मात्र कॅमेऱ्याची आवड आहे. कष्ट व मेहनत करण्याची तयारी असली तर या क्षेत्रात सावळ्या रंगाच्या अनेक तरुण- तरुणींनीही यश मिळवले आहे. 

नाशिकमध्येही विविध फॅशन डिझाईनचे शिक्षण देणाऱ्या संस्था फॅशन शो घेत असतात. त्यासाठी ते बाहेरून मॉडेल मागवतात तसेच काही स्थानिकांनाही संधी देतात. फॅशन डिझाइनसोबतच काही खासगी संस्थाही विविध फॅशन शो घेत असतात. त्यातून स्थानिक मॉडेलना संधी मिळते. मात्र स्थानिक पातळीवरील यश मिळवल्यानंतर पुढे जाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. 

नाशिकमधून संयमी खेर, सायली भगत, संस्कृती खेर, नमिता कोहोक, शिल्पी अवस्थी यांच्यासह अनेकांनी मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. यापैकी काहींनी चंदेरी दुनियेतही आपली छाप पाडली. 
नाशिकमध्ये मॉडेलिंगसाठी खूप संधी आहेत. पण तसे शिक्षण या ठिकाणी उपलब्ध नाही. आता जे फॅशन शो होत आहेत, ते आठ-पंधरा दिवसांचे शिबिर घेतात. त्यातूनच मग स्पर्धा घेऊन विजेते निवडले जातात. सध्या दर महिन्याला कोणती ना कोणती संस्था फॅशन शो घेते, हे चुकीचे आहे.

मॉडेलिंगमध्ये करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत. पण नाशिकमध्ये मॉडेलिंगचे अधिकृत शिक्षण देणारी संस्था असली पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मिस इंडियाच्या ऑडिशनमध्ये मी पहिल्यांदा रॅम्पवर उतरली होती, तेव्हा उपांत्य फेरीपर्यंत पोचले. त्यानंतर लॅक्‍मेतर्फे झालेल्या फॅशन शोमध्ये संधी मिळाली. पुढे ‘पुमा’साठी मॉडेलिंग केले. गेल्या वर्षी ‘सकाळ’तर्फे झालेल्या स्पर्धेतही भाग घेतला. नाशिकमध्ये फारशा संधी उपलब्ध नाही. या क्षेत्रात जर यायचे असेल तर शिक्षण पाहिजेच. पण त्याशिवाय कुटुंबाचा भक्कम आधार असल्याशिवाय या क्षेत्रात यश मिळवता येत नाही. 
- सना सय्यद, मॉडेल

ऑरा तसेच आयडीटी कॉलेज यांसह विविध स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मुंबईत जाऊनही विविध ठिकाणी ऑडिशन दिल्या. या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्या तरी मेहनत आणि संयम फार गरजेचा असतो. यासाठी तुम्हाला फिटनेस खूप सांभाळावे लागते. ‘नमामी शंकर’ या अल्बममध्ये काम केले आहे. 
- हितेश जेवरानी, मॉडेल

मॉडेलिंग क्षेत्रात नाशिकमध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. आम्हीही काही फॅशन शो घेत असतो. विजेत्यांना आम्ही पुढे मार्गदर्शनही करत असतो. मात्र असे असले तरी नाशिकमध्ये मॉडेलिंगचे शिक्षण देणारी कोणतीही संस्था नाही. त्यामुळे येथून चांगले मॉडेल पुढे येण्याचे प्रमाण खूप कमी आहे. चांगली संस्था आली तर येथील तरुणाईला त्याचा निश्‍चित उपयोग होणार आहे. 
- समीर तोरसेकर, समीज्ञा फाउंडेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modeling Education in Mumbai