मॉडेलिंगसाठी मुलीनेच रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नाशिक : मुंबई या स्वप्ननगरीमध्ये जाऊन मॉडेलिंग करण्याचे दिवास्वप्न पाहाणाऱ्या युवतीने मित्रांसमवेत मिळून स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि पालकांकडे चोरीच्या मोबाईलवरून संपर्क साधून 7 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्याने तपास करून मंगळवारची (ता.20) संपूर्ण रात्र तपास करीत, एका अल्पवयीन संशयितासह एकाला अटक केली असून युवतीच्याच सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. 

नाशिक : मुंबई या स्वप्ननगरीमध्ये जाऊन मॉडेलिंग करण्याचे दिवास्वप्न पाहाणाऱ्या युवतीने मित्रांसमवेत मिळून स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि पालकांकडे चोरीच्या मोबाईलवरून संपर्क साधून 7 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्याने तपास करून मंगळवारची (ता.20) संपूर्ण रात्र तपास करीत, एका अल्पवयीन संशयितासह एकाला अटक केली असून युवतीच्याच सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. 

सातपूर परिसरातील मध्यमवर्गीय कुटूंबीय राहत असून त्यांची मुलगी डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. सातपूर येथून ती अशोकस्तंभावरील लायन-माईंड इंग्लिश स्पिकींग कोर्ससाठी रोज सकाळी साडेसहा वाजता जाते. त्याप्रमाणे ती कालही (ता.20) सकाळी क्‍लासला आली. 10 वाजता परत घरी न आल्याने तिच्या आईने क्‍लासमध्ये फोन करून विचारले असता, ती सकाळी 9 वाजताच क्‍लासमधून गेल्याचे सांगण्यात आले. दुपारी चार वाजेपर्यंतही ती घरी परतलेली नव्हती. मात्र, पावणे पाच वाजेच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मुलीच्या आईला फोन आला आणि अज्ञात संशयिताने मुंबईतील वडाळ्यातून बोलत असून तुमची मुलगी पाहिले असेल तर 7 लाख रुपये तयार ठेवा, असे बोलून फोन ठेवून दिला. त्यानंतर परत फोन केला आणि त्यावेळी थेट मुलींशीच संशयितांनी बोलणे करून दिले. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी सातपूर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. 

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला. तांत्रिम माहिती आणि कुटूंबियांनी दिलेल्या तोडक्‍या माहितीच्या आधारे पोलिसांनी 8 ते 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्वत:च्या अपहृताचा बनाव रचलेल्या मुलीसह दोघा संशयितांना आज (ता.21) पहाटेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी सातपूर पोलिसात अपहरणाचा बनाव व इंदिरानगर पोलिसात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी सहाय्यक निरीक्षक देवरे, उपनिरीक्षक चव्हाण, राऊत यांच्यासह अंबड, सातपूर, इंदिरानगर व गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने बजावली. 

मॉडलिंगसाठी रचला होता बनाव 
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनाव रचणाऱ्या मुलीला मॉडेलिंग करायचे असल्याने त्यासाठी पैशांची गरज होती. म्हणून तिने तिच्या ओळखीतील एक अल्पवयीन व दुसरा संशयित साहील महेंद्र भांगरे (20, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्यासमवेत बनाव रचला. दोघा संशयितांनी पाथर्डी फाटा येथे काल दुपारी चार वाजता, जळगावहून नाशिकला कामानिमित्ताने आलेल्या युवकाकडे एसएमएस पाठविण्यासाठी म्हणून मोबाईल घेतला आणि पोबारा केला. त्याच मोबाईलवरून संशयितांनी मुलींच्या सांगण्यावरून तिच्या पालकांना फोन केला आणि खंडणीची मागणी केली.

पोलिसांनीही सुरुवातीला त्याच मोबाईलची माहिती एक दोन पथके तयार केली आणि जळगाव-चाळीसगावला रवाना केली. या पथकांनी मोबाईलच्या पत्तावरून संशयिताच्या घराजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. मात्र त्याचा मोबाईल चोरून गुन्ह्यात वापरला जात असल्याची बाब समोर आली. मध्यरात्रीची वेळ झाल्याने पुन्हा तपासाची दिशा बदलली. अखेरीस, तिच्या संपर्कातील एकेकल मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता, पाथर्डी फाटा परिसरातील अल्पवयीन संशयित हाती लागला. त्यास पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावरून दुसरा संशयित साहिलला अटक केल्यानंतर सदरची मुलगी ही पाथर्डी फाटा परिसरातील एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. तिघांनीही गुन्ह्यांची कबुली दिली असून दोघांविरोधात अपहरण व मोबाईल लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलीसह दोघांचा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

Web Title: for modeling girl planned her own kidnapping