'मोडी शिका सरावातून' पुस्तक आता ऍमेझॉनवर उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नाशिक  - 750 वर्षे मोडी लिपीने अधिराज्य गाजवले. आता मात्र मोडी लिपीचा वाचक आणि लेखक बोटावर मोजण्याइतका तुरळक झालेला आहे. येणाऱ्या नवीन पिढीसाठी मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार गरजेचे आहे. नवीनकुमार माळी यांचे "मोडी शिका सरावातून' हे पुस्तक आता ऍमेझॉन ऍपवर उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी मोडी लिपी अभ्यासक व अध्यापक रामकृष्ण बुटेपाटील, सोज्वल साळी उपस्थित होते.

माळी म्हणाले, का या पुस्तकात दिलेल्या मोडी लिपीचा उगम विकास, बाराखडी, अंक, जोडाक्षरे यांचा सराव पद्धतीने अभ्यास केल्यास ऐतिहासिक दस्तऐवज वाचणे वाचकांना मोडी वाचणे सोपे जाणार आहे. सर्व अक्षरांचे आकलन होण्यासाठी वाचन सराव महत्त्वाचा असतो म्हणून खास तयार केलेल्या सोप्या मोडी फॉन्टमध्ये हे राजर्षी शाहू महाराज छत्रपती या पुस्तकाचे टंकन केले आहे. यामध्ये शाहू महाराजांचे चरित्र मोडीमध्ये उपलब्ध असून मोडी रसिकांना मोबाईल आणि संगणकावर वाचन सरावासाठी पुस्तक उपलब्ध झाले आहे. डॉ. जयसिंगराव पवारलिखित राजर्षी शाहू छत्रपती हे मूळ पुस्तक देवनागरीमधून मोडीमध्ये लिप्यंतर करून माळी यांनी ई-बुक लॉंच केले आहे.

बुटेपाटील म्हणाले, की सरकार दरबारी मोडी लिपी जरी कालबाह्य झाली असली तरी मोडीचा 700 वर्षांचा म्हणजेच इसवी सन 12व्या शतकापासून उपयोग झालेला आहे. त्यामुळे भारताचा जुना इतिहास दस्ताऐवज हा मोडीतून आढळून येतो. नवीन पिढीसाठी मोडीचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याची त्यांनी सांगितले.

मोडी लिपीचा आता एक वर्षाचा अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ आणि गोवा विद्यापीठात येत्या जून महिन्यापासून सुरू होत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मराठी आणि इतिहास शिकवला जातो त्या ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असणार आहेत.
- नवीनकुमार माळी

Web Title: modi shika saravatun book available on amazon