रिक्षाचालकाकडून युवतीचा विनयभंग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून उडी घेतली.

नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. जखमी पीडितेला पाहून त्याच रस्त्याने जाणाऱ्या युवकाने केलेल्या चौकशीमुळे घटनेची वाच्यता झाली. संशयित रिक्षाचालकाला पाठलाग करून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. घटनेची माहिती 100 क्रमांकावर कळवूनही पोलिस घटनास्थळी अर्धा-पाऊण तासांनी पोचले. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा गाजावाजा करीत लॉचिंग करण्यात आलेल्या निर्भया पथकाची गस्तच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. याप्रकरणी संशयित रिक्षाचालकास अटक करून इंदिरानगर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

रवी गोफणे (वय 22, रा. गौतमनगर, रामायण हॉटेलमागे, गरवारे पॉइंट, अंबड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, ती बुधवारी (ता. 19) दुपारी अडीचच्या सुमारास संशयिताच्या रिक्षातून गरवारे पॉइंटकडे जात होती. त्या वेळी रिक्षा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेल अंगणसमोर आली असता, संशयिताने पीडित युवतीचा हात पकडला आणि "तू मुझे अच्छी लागती है' असे म्हणून तिचा विनयभंग केला. त्या वेळी पीडितेने संशयिताला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, संशयिताने रिक्षा थांबवली नाही. घाबरलेल्या युवतीने आरडाओरडा करण्याचाही प्रयत्न केला; तरीही संशयिताने रिक्षा थांबविली नाही. त्यामुळे पीडित युवतीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. या घटनेत तिच्या चेहऱ्याला व हाताला दुखापत झाली. 

...अशी झाली वाच्यता 
पीडितेने रिक्षातून उडी घेतल्यानंतर ती रस्त्यालगत जखमी अवस्थेत बसलेली असताना संशयित रिक्षाचालक उभा होता. त्याचवेळी दुचाकीवरून दीपक डोके हे जात असताना ते थांबले आणि त्यांनी जखमी पीडितेकडे चौकशी केली. त्यावेळी संशयित रिक्षाचालकाने ती रिक्षातून पडल्याचे सांगितले. त्यामुळे डोके यांनी तिला रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला असता, संशयित काही अंतरावर उभी केलेली रिक्षा घेण्यासाठी गेला. परंतु त्याने रिक्षासह फाळके स्मारकच्या दिशेने धूम ठोकली. दीपक डोके यांनी पीडितेकडे पुन्हा चौकशी केल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली. त्यावेळी डोके यांच्यासमवेत असलेल्या युवकाने संशयित रिक्षाचालकाचा पाठलाग केला. त्यास पांडवलेणी परिसरात पकडून परत आणले. त्यावेळी संशयिताने पकडण्यास आलेल्या तरुणाला हजार-दीड हजार रुपये देत सोडून देण्याची विनवणीही केली. दरम्यान, श्री. डोके यांनी तत्काळ 100 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सुमारे अर्धा-पाऊण तासाने गस्तीवरील दोन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

मुलगी खूपच घाबरलेली होती म्हणून थांबून चौकशी केल्यामुळे घटनेची माहिती दिली. रिक्षाचालकाचा पाठलाग करून पकडून पोलिसांच्या हवाली केले. 
- दीपक डोके 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Molestation of the girl by rickshaw driver