ग्रामरोजगार सेवकानेच केला 'इतका' निधी हडप...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

धामोडे ग्रामपंचायतीमधील रोजगार हमी योजनेच्या नियोजन कामासाठी कंत्राटी ग्रामरोजगार सेवक म्हणून मंगेश तानाजी भड (वय 30) याची नेमणूक केली होती. ग्रामपंचायत व बॅंकेमधील आर्थिक व्यवहारांची माहिती भडला होती. याचाच गैरफायदा घेत संशयिताने २२ एप्रिल ते २८ ऑक्‍टोबरदरम्यान धामोडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधून देना व ऍक्‍सिस बॅंकेचे काही धनादेश काढून घेऊन त्यावर तत्कालीन सरपंच शोभा भड (रा. धामोडे) व तत्कालीन ग्रामसेवक गंगाधर गवळी यांच्या बनावट सह्या करून व बनावट शिक्के मारले

नाशिक : ग्रामपंचायतींना थेट विकास निधी येऊ लागल्याने गैरप्रकार वाढले आहेत. तालुक्‍यात यापूर्वी दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. आता धामोडे ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार झाला आहे. सुमारे 39 लाख 39 रुपये निधी रोजगार सेवकानेच हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

निधी अपहाराच्या अनेक घटना..बनावट धनादेशाद्वारे 39 लाख हडप 

येवला तालुक्‍यातील रस्ते सुरेगाव व मुरमी येथे यापूर्वी निधी हडप झाल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. रोजगार हमी योजनेचा निधी अपहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. लाखोंचा निधी गावपुढारी परस्पर हडप करीत असून, मजुरांच्या नावे बनावट खाते उघडून त्यांचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेऊन हा लुटीचा गैरप्रकार आजही सुरू आहे. नियमांच्या चौकटीत बसवून अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने असे प्रकार सुरू आहे. सखोल चौकशीची मागणी होत आहे. 

धामोडे ग्रामपंचायतीत गैरव्यवहार

धामोडे ग्रामपंचायतीमधील रोजगार हमी योजनेच्या नियोजन कामासाठी कंत्राटी ग्रामरोजगार सेवक म्हणून मंगेश तानाजी भड (वय 30) याची नेमणूक केली होती. ग्रामपंचायत व बॅंकेमधील आर्थिक व्यवहारांची माहिती भडला होती. याचाच गैरफायदा घेत संशयिताने २२ एप्रिल ते २८ ऑक्‍टोबरदरम्यान धामोडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधून देना व ऍक्‍सिस बॅंकेचे काही धनादेश काढून घेऊन त्यावर तत्कालीन सरपंच शोभा भड (रा. धामोडे) व तत्कालीन ग्रामसेवक गंगाधर गवळी यांच्या बनावट सह्या करून व बनावट शिक्के मारले. बॅंकेत आरटीजीएसद्वारे सुमारे ३९ लाख रुपये अनुक्रमे राहुल बबन कांबळे, अष्टविनायक ट्रेडर्स व विश्‍वकर्मा ऍल्युमिनिअम तथा मंगेश व रवींद्र गोरखनाथ या नावाच्या खात्यांवर वळविले. 

पोलीसांनी केला गुन्हा दाखल

हा प्रकार लक्षात आल्याने विद्यमान ग्रामसेवक भगवान गायके (ग्रामसेवक ममदापूर व अतिरिक्त कारभार धामोडे ग्रामपंचायत) यांनी येवला तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भादंवि 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित मंगेश भड याला अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money grab by fake check at Dhamode Gram Panchayat Nashik Marathi News