पर्जन्याची सरासरी कोरडी ठेवूनच संपला पावसाळा!

पर्जन्याची सरासरी कोरडी ठेवूनच संपला पावसाळा!

येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे.धरणातील साठाही अवघ्या ७७ टक्के असल्याने येणारे दिवसात पाणीबाणी होणार हे नक्की आहे.
जिल्ह्यातील आजचे रखरखते चित्र पाहिल्यास २०१५ मधील स्थितीची आठवण होते. त्यावेळी ३० सप्टेंबर पर्यंत अवघा ६३ टक्के पाऊस झाला होता. मात्र खरिपाच्या दरम्यान एक दोन मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे थोडेफार तरी उत्पन्न हाती आले होते.या वर्षी आजपर्यंत ८७ टक्के पाऊस दिसत असला तरी हे आकडे गेल्या चार महिन्यातील रिमझिमीवर वाढले आहेत.शेतातील भयानक वास्तव दाहकतेचा पुरावा देते. मागील दोन वर्षांत सप्टेंबर अखेर पावसाने सरासरीची शंभरी गाठून शेतात खरिपाच्या उत्पन्नात वाढ केलीच पण रब्बीचा ही आशावाद जागवला होता. यावेळी मात्र रब्बीच्या पिकांचा शेतात उभा असतानाच पालापाचोळा झाला आहे. २००२-३ व ०९-१० मध्ये खरिपाची अशीच बिकट स्थिती झाली होती,त्या तुलनेत यंदाचे चित्र अजूनच भयानक आहे.

इगतपुरी व पेठनेच गाढली शंभरी
दोन वर्षापासून वार्षिक सरासरीचा आकडा प्रत्येक तालुक्याचा घटलेला असतांना देखील यंदा आजपर्यंत इगतपुरी व पेठ या पावसाच्या माहेरघरीच सरासरी ओलाडणारा पाऊस झाला आहे. नांदगाव व निफाडने तर पन्नाशीही ओलांडली नसून अशीच स्थिती मालेगाव,कळवण,बागलाण,दिंडोरी,येवला व सिन्नरची आहे.येवल्यात तर शहरात अधिक पाऊस आणि चारही मंडळात त्यांच्या निम्माच टक्के देखील पाऊस नसताना आकडे मात्र ९९ टक्के दाखवताय.जिल्ह्याची पर्जन्याची वार्षिक सरासरी एक हजार १३ मिलिमीटर असताना फक्त ८८१ म्हणजेच ८७ टक्के इतकाच पाऊस यंदा पडला आहे. यामुळे नदी,नाले,विहिरी कोरड्याठाक असल्याचे चित्र अर्ध्यावर जिल्ह्यात आहे.

दोन वर्ष गेले सुखात...
२०१७ मध्ये मात्र आजमितीस ११३ मिलिमीटर पाऊस पडून खरिपासह रब्बीचा प्रश्न मिटला होता.विशेष म्हणजे नाशिक व नांदगावने तर सरासरीचा दीडशतकी टप्पाही गाठला होता. फक्त मालेगाव,चांदवड, देवळा व निफाड या तालुक्यांचा आकडा मात्र नव्वदीत अडकून पडला असला तरी पिकांनी चांगली साथ दिली होती.याचमुळे जिल्ह्यात थेट मार्च उगवल्यानंतर टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली होती. २०१६ मध्येही असेच स्थिर चित्र दिसून आले त्यावेळी तर दुष्काळी येवला,सिन्नर,नांदगावमध्ये शंभरी ओलांडणारा पाऊस पडला होता. फक्त पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी,त्र्यंबक,सुरगाण्यासह मालेगाव व चांदवडला मात्र पावसाला नव्वदीत ब्रेक लागला होता.

२०१५ मध्ये तर अतिबिकट
२०१५ मध्ये तर अवघा त६३ टक्के पाऊस होऊन नाशिक वगळता सर्व तालुक्यांचे कंबरडे मोडले होते.यावेळी पेठ, त्र्यंबक,नांदगाव,कळवण,देवळा व येवला या तालुक्यांवर तर प्रचंड अन्याय करून वरुणराजाने ३० ते ६० टक्क्यांपर्यतच आकडे पोहोचवले होते.तेव्हा खरिपाची वाट लागून रब्बीचे तर पानही उगवले नव्हते.एकूणच मालेगाव,नांदगाव,चांदवड कळवण,देवळा,येवला,सिन्नर,निफाड या तालुक्यांनी मागील चारही वर्षात कमी अधिक प्रमाणात दुष्काळाच्या झळा सहन केल्याने शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे.आता परतीच्या पावसाने कृपा केली तर ठीक नाहीतर येणारे दिवस पाणीबाणी अन आर्थिक संकटात जाणार आहे. प्रशासनाने आता च दुष्काळ जाहीर करून शेतकऱयांना मदतीचा हात देण्याची स्पष्ट चिन्हे परिस्थितीने दाखविली आहे.

मागील वर्षी १९ धरणे तुडुंब,यंदा मात्र पाचच...
आताच्या स्थितीत एव्हाना जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरून अनेक ठिकाणाहून ओव्हरफ्लोचे पाणी शिवारात फिरत असते.यंदा मात्र पूर्णत हा विरोधाचे चित्र असून केवळ ७८ टक्के पाणीसाठा आहे.जिल्ह्यात मोठे सात व मध्यम १७ प्रकल्प असून मागील वर्षी आजच्या तारखेला २४ पैकी १९ धरणे तुडुंब १०० टक्के भरलेली होती. आज मात्र केवळ पाच मध्यम प्रकल्प तुडुंब आहेत. कालव्यांना सुटलेले पाणी केव्हाच बंद झालेले असून आजचे धरणातील आकडे पाहता पिण्याचे आरक्षित पाणी राखीव केले जाईल.परिणामी सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

“जिल्ह्याची भौगोलिक स्थिती विषमस्वरुपाची आहे.पेठ-सुर्गाण्यात मुसळधार तर शेजारील कळवण मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असतो.किंबहुना सिन्नर,येवला,निफाडमध्ये देखील तीन भागात वेगवेगळे पर्जन्यमान आहे.हा विचार करता शासकीय आकडे गुहीत न धरता गाव घटक मानून तेथील परिस्थितीनुसार दुष्काळ तातडीने जाहीर करावा.”
भागवत सोनवणे,संयोजक,जलहक्क समिती

२०१५ नंतर पडलेला तालुकानिहाय पाऊस (मिमी)
तालुका -- वार्षिक सरासरी -- २०१५ -- २०१६ -- २०१७ -- २०१८ 
नाशिक  -- ६१४ -- ६९२ -- १०६५ -- १०७३ -- ६०१
इगतपुरी  -- ३३२५ -- २५४५ -- ३४१२ -- ३८०४ -- ३२३४
दिंडोरी  --  ६९६ -- ४८८  -- १०३३ -- ७८९ -- ४४१
पेठ    -- २१९४  -- १०८५ -- २४२५ -- २४४६ -- २३०५
त्रंबकेश्वर -- २१९४  -- १०२२ -- १७५७ -- २२९१ -- १५९८
मालेगाव -- ४४०  -- ४०२ -- ४३७ -- ३४३ -- २९२
नांदगाव --  ४६७  -- १६८ -- ५३९ -- ७०४ -- २३३ 
चांदवड -- ५१८  -- ३९७ -- ५१६ -- ४७६ -- ३८४
कळवण -- ६६४  -- ५२३  -- ७४६ -- ६२६ -- ४६०
बागलाण -- ४१९ -- ३८५ -- ६०६ -- ४४६ -- २९०
सुरगाणा -- १७४४ -- ११०१ -- १५६१ -- २२८८ -- २०७४
देवळा  -- ५७१  -- २९७  -- ६२८ -- ४५२ -- ३२४
निफाड -- ४२७ -- ३८२ -- ५८१ -- ४०७ -- २१३
सिन्नर  -- ४९२  -- ४२९  -- ७३९ -- ६७१ -- ३४५
येवला  -- ४३३  --  ३२४ -- ५१७ -- ४६२ -- ४३१

प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी (दलघफू.)
गंगापूर -- ५१०७ -- ९१
पालखेड -- ३३७ -- ५२
करंजवन  -- ५०५४ -- ९४
वाघाड  -- २३०२-- १००
ओझरखेड -- १९२१ -- ९०
दारणा -- ६६६० -- ९३
मुकणे -- ५३६८ -- ७४
कडवा -- १४४२ -- ८५
चणकापूर -- २३६३ -- ९७
गिरणा -- ८८६७ -- ४८
माणिकपुंज -- ६२ -- १९
एकूण - ५११४० - ७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com