काँग्रेस अन्‌ राष्ट्रवादीपेक्षा भाजपकडूनच अधिक छळ - गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

जळगाव - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात त्रास झाला. परंतु, त्यापेक्षा अधिक त्रास आज भाजप शिवसेनेला देत आहे. शिवसैनिकांची ही कसोटी आहे, एकजुटीने त्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. या वादळातून पक्ष निश्‍चित यशस्वीरीत्या बाहेर पडेल, असे मत शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

जळगाव - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात त्रास झाला. परंतु, त्यापेक्षा अधिक त्रास आज भाजप शिवसेनेला देत आहे. शिवसैनिकांची ही कसोटी आहे, एकजुटीने त्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. या वादळातून पक्ष निश्‍चित यशस्वीरीत्या बाहेर पडेल, असे मत शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची तयारी सुरू आहे. जळगाव येथील हॉटेल रॉयल पॅलेस येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज झाला. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्या इंदिराताई पाटील, माजी देविदास भोळे आदी उपस्थित होते. 

मेळाव्यात श्री. पाटील म्हणाले, की राज्यात सत्ता असताना पैशांच्या भरवशावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस निवडणुका लढवीत होती. मात्र आता त्यांच्यापेक्षाही अधिक पैशांचा वापर भारतीय जनता पक्ष करीत आहे. पालिका निवडणुकांमध्येही त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला. त्याचप्रमाणे भाजप जिल्हा परिषद निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करणार आहे. 

सेना ‘दुश्‍मन’ वाटते
भाजपबाबत बोलताना श्री. पाटील म्हणाले, की भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या मदतीने राज्यात वाढला. परंतु, तेच आज आम्हाला दुश्‍मन समजत आहेत. केवळ जळगावचा हा विषय नाही, तर भारतीय जनता पक्षाकडून हा त्रास थेट मुंबईपासून आहे. मात्र, शिवसेनेने अनेक धक्के पचविले आहेत. भुजबळ, राणे आणि राज ठाकरे पक्ष सोडून गेले, त्यावेळी आम्हाला पक्ष संपेल अशी भीती वाटत होती. परंतु, त्यानंतरही सेना खंबीरपणे उभी राहिली आहे. आता भाजपच्या या वादळातूनही शिवसेना निश्‍चित बाहेर पडेल.

भाजपत नाराजी वाढणार
जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, की भारतीय जनता पक्षात नाराजी निश्‍चित वाढणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे मूळ भाजपच्या असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होईल. याचा भाजपला फटका बसून शिवसेनेला फायदा होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावयाचे आहे. 

सर्व जागा लढविण्याची तयारी
युतीच्या संदर्भात गुलाबराव पाटील म्हणाले, की आम्ही युती करण्यास तयार आहोत. परंतु अद्यापही भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे आम्ही जिल्ह्यात सर्व जागा लढण्याची तयारी केली आहे. दोन्ही पक्षांची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी जवळजवळ निश्‍चित झाली आहे.

तालुकापातळीवर युती होत असल्यास ती करावी, असे आपण तालुक्‍याच्या कार्यकर्त्यांना कळविले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होत असेल आणि शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढत असेल, तर त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. तरीही सेनेच्या यावेळी किमान २५ जागा निवडूनच येतील.

अध्यक्षपदासाठी पाच कोटी
जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापतिपदासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची बोली विरोधकांकडून लावली जात असल्याचा आरोप सहकार राज्यमंत्री पाटील यांनी केला. कोणत्याही पक्षाचे नाव न घेता ते म्हणाले, की जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पाच कोटी रुपये, तर सभापतिपदासाठी एक कोटी रुपयांची बोली लावली जात आहे. 

Web Title: More cruel than the Congress and the NCP by bjp