मर्यादित क्षेत्रफळात जमिनीअभावी घरांच्या किंमती जास्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

जळगाव - शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ मर्यादित आहे. स्वाभाविकच या मर्यादित क्षेत्रात पुरेशी जमीन उपलब्ध नाही. बांधकामाला जो खर्च आवश्‍यक आहे, तो लागणारच. मात्र, जागेच्या किंमतीवर घर, फ्लॅटस्‌च्या किंमती ठरत असतात. शहराच्या मर्यादित क्षेत्रफळामुळे जागाच उपलब्ध नसल्यामुळे आहे त्या जागांच्या किंमती जास्त आहेत, त्यामुळेच घर व फ्लॅटस्‌च्या किंमती नाशिक, पुण्याच्या बरोबरीने जळगावातही आहेत, असे स्पष्ट मत येथील बांधकाम व्यावसायिक व क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या देशव्यापी संघटनेचे जळगाव शाखेचे अध्यक्ष अनीश शाह यांनी व्यक्त केले.

जळगाव - शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ मर्यादित आहे. स्वाभाविकच या मर्यादित क्षेत्रात पुरेशी जमीन उपलब्ध नाही. बांधकामाला जो खर्च आवश्‍यक आहे, तो लागणारच. मात्र, जागेच्या किंमतीवर घर, फ्लॅटस्‌च्या किंमती ठरत असतात. शहराच्या मर्यादित क्षेत्रफळामुळे जागाच उपलब्ध नसल्यामुळे आहे त्या जागांच्या किंमती जास्त आहेत, त्यामुळेच घर व फ्लॅटस्‌च्या किंमती नाशिक, पुण्याच्या बरोबरीने जळगावातही आहेत, असे स्पष्ट मत येथील बांधकाम व्यावसायिक व क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या देशव्यापी संघटनेचे जळगाव शाखेचे अध्यक्ष अनीश शाह यांनी व्यक्त केले. नोटाबंदीचा निर्णय धाडसी असला, तरी त्यामुळे बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. मात्र, या निर्णयामुळे गृहकर्ज स्वस्त होण्यात मदत होईल, असेही श्री. शाह म्हणाले. 

"सकाळ'च्या औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयात आयोजित "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात श्री. शाह बोलत होते. प्रारंभी निवासी संपादक विजय बुवा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर श्री. शाह यांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध मुद्यांवर मनमोकळी चर्चा केली. 

तीन गुणांमुळे डॉक्‍टर होण्याची संधी गेली 
दाणाबाजारात वडिलांचा होलसेल धान्याचा व्यवसाय. लहानपणापासूनच स्कॉलर असलेल्या अनीश यांचे प्राथमिक शिक्षण भगीरथ शाळेत, 12 वीपर्यंतचे शिक्षण मू. जे. महाविद्यालयात झाले. 12 वीला अवघे तीन गुण कमी मिळाल्याने त्यावेळी बी. जे. मेडिकल कॉलेजला नंबर लागला नाही व डॉक्‍टर होण्याची संधी त्यांनी गमावली. मात्र, "पीसीएम' ग्रुपमुळे देशभरात अव्वल दहामध्ये असलेल्या मणिपालच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी अभियांत्रिकीतील पदवी मिळवली व वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाला हातभार लावण्यास प्रारंभ केला. 

क्रेडाईची स्वयंस्वीकृत आचारसंहिता 
क्रेडाईबद्दल सांगताना श्री. शाह म्हणाले, बांधकाम क्षेत्रात काम करताना सुरवातीला प्रमोटर्स ऍण्ड बिल्डर्स असोसिएशन होती, त्या संघटनेचा सदस्य झालो. नंतर जिल्हा व राज्यस्तरावरील या संघटना देशव्यापी क्रेडाईमध्ये वर्ग झाल्या. साधारण 1999 पासून क्रेडाईचे काम सुरू झाले. गेल्या दोन वर्षांपासून क्रेडाई, जळगावच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यवहार पारदर्शी व्हावे, ग्राहकाची फसवणूक होऊ नये, यासाठी क्रेडाईची स्वयंस्वीकृत आचारसंहिता आहे. त्यानुसारच संघटनेची वाटचाल चालते. सोबतच सरकारचे नगररचना व त्यासंबंधी धोरण ठरविताना सूचना देण्याचे काम क्रेडाई करते. 

जळगावात घरांच्या किंमती अधिक 
इतर विकसित शहरांच्या तुलनेत जळगावात तयार घरे, फ्लॅटस्‌च्या किंमती अधिक आहेत. याबाबत विचारले असता श्री. शाह म्हणाले, जळगाव शहराचे क्षेत्रफळ 69 चौरस किलोमीटर एवढे मर्यादित आहे. त्यामुळे या मर्यादित क्षेत्रात जागेची उपलब्धता पुरेशी नाही. शिवाय शहराच्या विस्तारित भागात मूलभूत सुविधा नसल्याने त्याठिकाणी नागरी वस्त्या विकसित होण्याला वाव नाही. त्यामुळे मनपा हद्दीतील, त्यातही ज्याठिकाणी नागरी सुविधा आहेत, त्याठिकाणच्या जमिनीचे दर अधिक आहेत. बांधकामाचा दर जो नाशिक, औरंगाबादला आहे, तोच जळगावातही लागतो. मात्र, जमिनीच्या दरामुळे एकूणच तयार घरांच्या किंमती कमी होत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

सरकारच्या धोरणावर परवडणारी घरे शक्‍य 
सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होणे, ही आमचीही प्राथमिकता आहे. मात्र, त्यासाठी सरकारचे धोरण योग्य व पूरक हवे. त्यासाठी क्रेडाई प्रयत्नशील आहे. शहरांच्या वाढीव हद्दीत पायाभूत सुविधा दिल्या व जमीन "ट्रेडेबल कमोडिटी'तून मुक्त केली तर जागेच्या व पर्यायाने घरांच्या किंमती कमी होऊ शकतील. पायाभूत सुविधा, गृहकर्ज या बाबी सरकारवर अवलंबून आहे, त्यामुळे सरकारचे सहकार्य मिळाले तर परवडणारी घरे गरजूंना उपलब्ध होऊ शकतील. 

नोटाबंदीचा मार्केटवर विपरीत परिणाम 
काळा पैसा अधिकतर रिअल इस्टेटमध्येच असल्याचे बोलले जाते, याबाबत छेडले असता श्री. शाह म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयानंतर दीड महिना उलटला. त्यामुळे, खरा काळापैसा समोर आलाच नाही. मात्र, या निर्णयामुळे एकूणच बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला. रिअल इस्टेटमधील पैसा गुंतवणुकीच्या स्वरूपात विविध प्रकल्पांमध्ये अडकलेला आहे, त्याला काळा पैसा म्हणता येणार नाही. उलटपक्षी या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाशी संबंधित मजूर, बांधकाम करणारे कामगार, सेंट्रिंग काम व प्लॅस्टर करणारे मिस्तरी, वीटभट्टी कामगार, प्लंबर, वेल्डर्स, रंगकाम करणारे पेंटर आदी सर्वच सामान्य व गरीब घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे, तसेच बाजारपेठेतही मंदीचे सावट असल्याचा दावा श्री. शाह यांनी केला. 

करांची रचना वास्तववादी असावी 
प्रचलित करप्रणाली व येऊ घातलेल्या "जीएसटी'बद्दल बोलताना अनीश शाह म्हणतात, करांचे दर व रचना वास्तववादी असावी. बांधकामावरील नोंदणी फी व मुद्रांक शुल्क मिळून 9 टक्के कर होता. तो तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी 2005-06मध्ये 6 टक्‍क्‍यांवर आणल्यानंतर राज्याच्या महसुलात तब्बल दुप्पट वाढ झाली. त्यामुळे कर जास्त तर उत्पन्न अधिक असे समीकरण लावणे उचित नाही. जीएसटी लागू करताना सरकारने याचा विचार केला पाहिजे. कर जास्त व जाचक स्वरूपाचे असतील तर त्याची चोरी होती. उलटपक्षी ते वास्तववादी असतील तर करचोरी होणार नाही. 

कुटुंबासोबत गीतांचा आनंद 
बांधकाम व्यवसायातील अत्यंत प्रामाणिक आणि सुस्वभावी अशी ओळख असलेल्या अनीशभाईंचे बालपण जीएस मैदानावर खेळण्यात गेले. कबड्डी, खो-खो, क्रिकेट खेळत त्यांनी मित्र जमविले. आजही या मित्रांशी ऋणानुबंध कायम आहेत. गीत-संगीताची त्यांनी विशेष आवड. सुटीच्या दिवशी पूर्ण कुटुंबासोबत गाणे ऐकायला त्यांना आवडते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडीचे गाणे एकापाठोपाठ एक लावायचे व त्याचा आनंद घ्यायचा. शिवाय, ज्ञान-विज्ञानाविषयी वाचनाचीही त्यांना आवड आहे. विशेषत: भौतिकशास्त्राशी संबंधित विषय वाचायला त्यांना आवडते, असे ते सांगतात. 

Web Title: More limited land area and the lack of housing prices