नाशिक विभागात सर्वाधिक कर वसुलीचा नवा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

ज्या नगर परिषदांची कर वसुली 90 टक्क्यांपेक्षा जास्त होईल त्याच नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच निवृत्ती वेतनासाठी शासनाकडून 100 टक्के सहाय्यक अनुदान मिळणार आहे.

सटाणा - सटाणा नगर पालिकेने सन 2017-18 या आर्थिक वर्षात शहरातील घरपट्टी व पाणीपट्टीची 95 टक्के विक्रमी करवसुली करून नाशिक विभागात सर्वाधिक कर वसुलीचा नवा विक्रम केला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी येथे दिली. याबाबत बोलताना मुख्याधिकारी श्रीमती डगळे म्हणाल्या, सन 2017-18 या आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टीची 3 कोटी 66 लाख रुपये करवसुली झाली असून प्रशासनाने योग्य नियोजन करून वसुली विभागातील 1 ते 11 या सर्व झोनचे प्रमुख आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळेच ही विक्रमी करवसुली शक्य झाली. नागरिकांनीही मुदतीत आपली थकबाकी भरून प्रशासनाला सहकार्य केले, याचे समाधान आहे.

ज्या नगर परिषदांची कर वसुली 90 टक्क्यांपेक्षा जास्त होईल त्याच नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच निवृत्ती वेतनासाठी शासनाकडून 100 टक्के सहाय्यक अनुदान मिळणार आहे. विक्रमी करवसुली झाल्याने शासनाकडून आता सहाय्यक अनुदान प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे नगरपालिका निधीतून वेतन व निवृत्तीवेतन यावर होणारा खर्च वाचणार असल्याने शिल्लक राहिलेला निधी नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या आर्थिक वर्षात नगरपालिका प्रशासनाने 93 टक्के करवसुली केल्यामुळे वाढीव सहाय्यक अनुदान म्हणून शासनाने 31 मार्च 2017 रोजी 86 लाख रुपये पालिकेच्या खात्यावर वर्ग केले होते. प्रत्येक प्रभागातील थकीत मालमत्ताधारकांशी नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी सकारात्मक संवाद साधून कर वसुलीसाठी त्यांना प्रवृत्त केले. तर काही थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले असल्याचे श्रीमती डगळे यांनी स्पष्ट केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Most tax collections have been done in Nashik division