आधी दीड वर्षाच्या लेकराचे जीवन संपविले मग स्वत:चे.....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

चार वर्षापूर्वी राहीबाईचा विवाह माणिकपुंज गावच्या गणेशनगर वस्तीत राहणाऱ्या गोरख मेंगाळ याचेशी झाला. त्यानंतर नामे संदीप या मुलास राहीबाईने जन्म दिला. यंदाच्या दिवाळीला राहीबाई माहेरी आली होती. आठ दिवस राहून गेली. वैवाहिक जीवनाबद्दल तिने कधीच तक्रार केली नव्हती. असे तिचे वडील विलास भूतांबरे यांचे म्हणणे आहे. हे कसे घडले हेच कळत नाही अशी सुन्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नाशिक : गणेशनगर या ठिकाणी राहणाऱ्या एका आईने आधी आपल्या दीड वर्षाच्या मुलाला गळफास लावून त्याचे जीवन संपवले आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील माणिकपुंजच्या गणेश नगर वस्तीत भरदिवसा हा प्रकार घडला. या प्रकरणी मृत विवाहीतेचा पती गोरख मेंगाळ याने पत्नी राहीबाई हिने आपल्या मुलाचा गळफास लावून खून केला व नंतर स्वत:स गळफास लावून आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद नांदगाव पोलिसात मंगळवारी (ता.१२) रात्री २ वाजता दिली असून पत्नीच्या आई वडिलांनी याप्रकरणी आपली तक्रार नसल्याचे सांगितले असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

एक आई एवढी निर्दयी कशी असेल?...गूढ कायम...

चार वर्षापूर्वी राहीबाईचा विवाह माणिकपुंज गावच्या गणेशनगर वस्तीत राहणाऱ्या गोरख मेंगाळ याचेशी झाला. त्यानंतर नामे संदीप या मुलास राहीबाईने जन्म दिला. यंदाच्या दिवाळीला राहीबाई माहेरी आली होती. आठ दिवस राहून गेली. वैवाहिक जीवनाबद्दल तिने कधीच तक्रार केली नव्हती. असे तिचे वडील विलास भूतांबरे यांचे म्हणणे आहे. हे कसे घडले हेच कळत नाही अशी सुन्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बंद दरवाजा खटखटावून ही आतून प्रतिसाद मिळेना

१२ नोव्हेबरला तिचा पती गोरख खडी क्रशरच्या कामावर गेला तर दिर शरद मेंगाळ व त्याची पत्नी शेतात कामाला गेले. सायंकाळी शेतातून परत आलेल्या शरद याला घराचा बंद दरवाजा खटखटावून ही आतून प्रतिसाद मिळेना. म्हणून छपरावर जाऊन कौले उचकावून आत बघितले असता पुतण्या संदीप व राहीबाई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे घाबरलेल्या शरद याने तातडीने गोरखला फोन करून बोलावून घेतले. पोलीस पाटील सदाशिव मेंगाळ यांनी पोलिसांना कळवले. पोलीस आल्यानंतर दोन्ही प्रेत खाली उतरविण्यात आली.

अंगावर इतर जखमा नाहीत

घराच्या वास्याला नायलॉन दोर अडकवून पलंगाच्या कडेला उभे राहुन तिने उडी घेतल्याने गळफास आवळला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तिचे सासू सासरे गेली सहा वर्षे वनविभागाच्या जमिनीवर कोपीत राहतात. घरी पती, दीर, त्याची पत्नी जाईबाई व राहीबाई आणि संदीप असे राहत असत. शवविच्छेदनात सकृतदर्शनी गळफासाने मृत्यू झाल्याचे दिसत असून अंगावर इतर जखमा नाहीत. असे डॉ. रोहन बोरसे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother commits suicide after killing her 1-and-a-half-year-old son Nashik News