'जिद्दीतूनच घडते करिअर'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

धुळे - जिद्द असली, की करिअर घडते. यात प्रथम अभ्यासाला प्राधान्य द्यावे. सोबत व्यक्तिमत्त्व विकास घडवत जावा. याची सांगड जो घालेल, त्याला यश हुलकावणी देऊ शकत नाही, असा सल्ला ‘मिसेस हेरिटेज’ मृणाल गायकवाड- मराठे यांनी आज येथे दिला. 

धुळे - जिद्द असली, की करिअर घडते. यात प्रथम अभ्यासाला प्राधान्य द्यावे. सोबत व्यक्तिमत्त्व विकास घडवत जावा. याची सांगड जो घालेल, त्याला यश हुलकावणी देऊ शकत नाही, असा सल्ला ‘मिसेस हेरिटेज’ मृणाल गायकवाड- मराठे यांनी आज येथे दिला. 

जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या ॲड. झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयात ‘रंगचैतन्य’ या स्नेहसंमेलनाचा समारोप आणि पारितोषिक वितरणासाठी सौ. मराठे, शिल्पकार सरमद पाटील प्रमुख पाहुणे होते. प्राचार्य डॉ. पी. एच. पवार अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य प्रा. बी. आर. चौधरी, प्रा. विद्या पाटील, प्रा. शारदा शितोळे, डॉ. एस. ए. मोरे, डॉ. सी. एन. पगारे व्यासपीठावर होते. सौ. मराठे, शिल्पकार पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला. 

विद्यार्थी प्रभावित
श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या जागतिक ‘टिआरा’ सौंदर्य स्पर्धेत २१ देशांतून तिसरा क्रमांक आणि मिसेस हेरिटेज किताब पटकावणाऱ्या मूळच्या येथील सौ. मराठे म्हणाल्या, की जयहिंद महाविद्यालयात मी शिकले. अभ्यासाला प्राधान्य देताना व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला. क्रीडा क्षेत्र, ‘एनसीसी’त सहभाग नोंदविला. कधीही ‘डिस्टिंक्‍शन’ सोडले नाही. या प्रगतीत महाविद्यालयाचे पाठबळ राहिले. यातून पुढे सौंदर्य स्पर्धा, यासंबंधी क्षेत्रात करिअर केले. सौ. मराठे, शिल्पकार पाटील यांच्या मनोगतातून विद्यार्थी प्रभावित झाले. 

‘सेल्फी’साठी गर्दी
मुंबईस्थित सौ. मराठे या धुळ्याच्या, जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याचे कळाल्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी एकच जल्लोष केला. स्वतःसह धुळ्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक उंचावल्याने टाळ्यांच्या कडकडाटात सौ. मराठे यांचा सन्मान केला. कार्यक्रमानंतर त्यांना ‘सेल्फी’साठी विद्यार्थिनींनी गराडा घातला. प्रा. वर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मोरे यांनी आभार मानले.

Web Title: mrunal gaikwad marathe