लोकसहभागातून क्रांती; गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेतजमीन

jaitane
jaitane

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील कळंभीर (ता.साक्री) शिवारातील व रायपूर बारीजवळील 'सालदरा' धरणातून लोकसहभागाने गाळ काढण्यासाठी रायपूरवासीयांनी पुढाकार घेतला असून येथील शेतकरी धनराज कारंडे व कळंभीर येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सोमवारी (ता.२) सकाळी साडेअकराच्या सुमारास साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते ह्या कामाचा शुभारंभ झाला..

४५ वर्षातील गाळ काढण्याचा पहिलाच प्रसंग..
ह्या धरणातून १९७२ नंतर अर्थात गेल्या ४५ वर्षांत गाळ काढला गेला नव्हता. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचून जलसाठाही कमी झाला होता. त्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी हे क्रांतिकारी पाऊल उचलले. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असून गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यासही मदत होईल. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी धरणातील 'गाळ'चा उपयोग करून शेतीची सुपीकता वाढवावी असे आवाहन करण्यात आले.

"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेतजमीन" : तहसीलदार संदीप भोसले.
"धरणे ही गाळमुक्त असावीत, तर शेतजमीन ही गाळयुक्त असावी" असे प्रतिपादन साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांनी केले. प्रत्येक काम हे शासनानेच केले पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता काही कामे ही ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत लोकसहभागातून केली पाहिजे, असेही पुढे ते म्हणाले.

किमान २५ ते ३० हजार ट्रॅक्टर गाळ निघण्याची शक्यता..
या धरणातून किमान २५ ते ३० हजार ट्रॅक्टर गाळ निघणार असून रायपूरसह कळंभीर, शिवाजीनगर, भामेर आदी गावांच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. केवळ नाममात्र शुल्कात हा गाळ उपलब्ध होणार असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यासही मदत होणार आहे.

सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता स्वखर्चातून..
रायपूरबारीपासून ते धरणापर्यंतचा सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता धनराज कारंडे व जितेंद्र ठाकरे यांनी स्वखर्चातून केला असून  त्यामुळे जेसीबी, ट्रॅक्टर, मोटारसायकल आदी वाहने थेट धरणापर्यंत जाऊ शकतात. ह्या कामासाठी किमान दहा ट्रॅक्टरे व एक जेसीबी यंत्र अविरत कार्यरत आहे. शेतकरी जितेंद्र अमृत ठाकरे यांच्या वडिलोपार्जित मालकीची सुमारे ३ हेक्टर, ४२ आर जमीन ही धरणाखाली गेली आहे.

रोजगार हमी योजनेतून अनुदानाची उपलब्धता..
परिसरातील धरणांतून लोकसहभागाने गाळ काढण्यासाठी रोजगार हमी योजनेतून नियमानुसार अंशतः अनुदान उपलब्ध करून दिले जाणार असून इतरांनीही त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन 'रोहयो'चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले आहे. शिवाजीनगर (ता.साक्री) येथील ग्रामस्थांनीही पुढाकार घेऊन साक्री-नंदुरबार रस्त्यावरील गावालगतच्या बंधाऱ्यातून गाळ काढून त्याचे खोलीकरण व रुंदीकरण करावे असे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले.

यावेळी तहसीलदार संदीप भोसले यांच्यासह साक्रीचे मंडळाधिकारी निलेश ठाकूर, कळंभीरचे तलाठी आर. एन. नांद्रे, 'रोहयो'चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत चव्हाण, रायपूरचे ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम कोरडकर, शेतकरी जितेंद्र ठाकरे, धनराज कारंडे, कळंभीरचे माजी सरपंच स्वामी दाभाडे, भटु सरग, किरण ठाकरे, हितेंद्र ठाकरे, सुभाष थोरात, दगडू कोरडकर, गोरख मारनर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com