मुखेड ग्रामपंचायतसह पंच ट्रस्टचा कारभार संशयास्पद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

“गाळेधारकांकडून कुणाचेही हातावर पैसे घेतलेले नाही. संस्थेचे दरवर्षी ऑडिट होते. प्रोसिडिंगवर विश्वस्तांच्या सह्या आहेत. येथे गाळे बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडून रितसर बांधकाम परवाना घेतला आहे. त्यामुळे आरोपात तथ्य नाही.

-  छगन आहेर,अध्यक्ष,पंच ट्रस्ट,मुखेड

येवला : येथील न्यायालयाच्या स्थगिती आदेशाला न जुमानता मुखेड ग्रामपंचायतीने अनधिकृतपणे जागा वाटपाचा व्यवसाय चालवला आहे. विद्यमान सदस्यांची अनेक कामे गैरप्रकाराची असून या संशयास्पद कामाची चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच रवींद्र आहेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण आहेर यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी न करता ग्रामपंचायत सदस्यांना पदच्युत न केल्यास जिल्हा परिषद कार्यालायासमोर आमरण उपोषणाचाही इशाराही त्यांनी दिला आहे.

येवला न्यायालयात रवींद्र आहेर यांनी दाखल केलेल्या दाव्यावर मुखेड येथील बाजार तळावर व्यावसायिकांना तात्पुरत्या स्वरूपात टपऱ्या वा पक्क्या बांधकामास न्यायालयाने २०१६ मध्ये स्थगितीचा आदेश काढला. यावर सध्या कामकाज सुरू असताना सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी हा आदेश धाब्यावर बसवून व्यावसायिकांना टपऱ्या टाकण्यास अधिकृतपणे मंजुरी देत आहे. मोकळ्या जागांवर रात्रीच्या वेळेस टपरीधारकांनी कब्जा मारल्यानंतर 'अर्थपूर्ण ' रित्या टपरीधारकांना सदस्य ग्रामविकास अधिकाऱ्यावर दबाव टाकून ठराव करून दिले जात असल्याची तक्रारही यावेळी आहेर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सत्तेचा गैरवापर करून जनतेला अंधारात ठेवत ग्रामपंचायत सदस्यांनी कुटुंबीय व हितचिंतकांच्या नावाने टपऱ्यांचे ठराव केले आहे. उपसरपंच बिपीन धनराव यांनी तर भाऊ आणि वडिलांच्या नावे एकत्रित कुटुंबात घरकुल योजनेचा लाभ घेतला असून चौकशी करण्याची मागणी आहेर यांनी केली. गावातील अतिक्रमित टपरीधारकांना तीन नोटिसा बजविण्यात आल्यानंतरही अतिक्रमित टपऱ्या अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत.

गावकरी पंच ट्रस्टमध्येही मनमानी

येथील सार्वजनिक गावकरी पंच ट्रस्टच्या मालकीच्या मिळकत क्रमांक १४५ व १४६ या जागेवर व्यावसायिक गाळ्यांची कामे शासकीय व तांत्रिक मंजुरी न घेता अवैधरित्या बांधकाम सुरु असल्याची तक्रार ट्रस्टचे विश्वस्त रघुनाथ पानसरे, विठ्ठल कांगणे यांनी केली आहे.

विश्वस्तांना विश्वासात न घेता व्यावसायिकांकडून हातावर पैसे घेऊन व्यवहार करीत असून ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव यांना निलंबित करून प्रशासक नेमण्याची मागणी धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य भानुदास आहेर उपस्थित होते.

Web Title: Mukhed Gram Panchayat along with the suspicion of the administration of the panch trust