मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मुक्ताईनगर - आषाढी वारीनिमित्त प्रमुख मानाच्या संत मुक्ताबाई पालखीचे कोथळी (मुक्ताईनगर) समाधीस्थळाहून आज सकाळी लवाजम्यासह भक्तिपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. सुमारे 309 वर्षापासून वै. राम महाराज दुधलगावकर यांनी सुरू केलेल्या मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यभरातून व शेजारी मध्य प्रदेशातून आलेल्या भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रस्थान सोहळ्यानिमित्त सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली.

वारकऱ्यांना बियाणे वाटप
"निर्मल वारी, हरित वारी' या अभियानांतर्गत वारकऱ्यांना बियाण्यांची पाकिटे वाटली. ती बियाणे वारकऱ्यांनी मुक्कामाच्या गावी लावावी, जेणेकरून तेथील भाविक मुक्ताबाईचे झाड म्हणून संगोपन करतील, अशी अपेक्षा शिवाजीराव महाराज मोरे (पंढरपूर) यांनी व्यक्त केली. माजी मंत्री एकनाथ खडसे, ऍड. रवींद्र पाटील, ऍड. माधवी निगडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

मुक्ताई संस्थानचे मानकरी रवींद्र पाटील यांनी पादुकांना पंचामृताने अभिषेक केला व विधिवत पादुका पालखीत स्थानापन्न केल्या. पौरोहित्य विनायक व्यवहारे यांनी केले. पंचपदी भजनानंतर, आरतीनंतर "मुक्ताबाई.... मुक्ताबाई...'च्या जयघोषात मंदिर परिक्रमा करीत पालखीचे पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रस्थान झाले. सोहळ्याचा आजचा पहिला मुक्काम सातोड गावी असून, उद्या (ता. 19) सोहळा बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

"ते' वक्तव्य इनामदारांचे
मला अडकविण्यात एका मंत्र्याचा हात असल्याचे वक्तव्य मी केले नसल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताई पालखी सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मला अडकविण्यात मंत्र्यांचा हात असल्याचे वक्तव्य मी नाही, तर कल्पना इनामदार यांनी पत्रकार परिषदेत केले होते. तसेच मी फक्त माझ्याविरुद्ध रचलेल्या कटकारस्थानाची चौकशी करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Web Title: muktai palkhi pandharpur aashadhi wari