अबब चार टन क्षमतेच्या डंपरमध्ये नऊ टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

जळगाव ः शहरातील कचरा उचलण्याचे काम वॉटरग्रेसला ठेका दिला आहे. परंतु नियमित कचरा उचलला जात नाही. जो उचलला जातो; त्यात देखील माती टाकून वजन वाढविण्याचे काम होत आहे. शिवाय चार टन क्षमता असलेल्या डंपरमध्ये नऊ टन कचरा असल्याची नोंद केली जात असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत सफाईचा एकमुस्त ठेका रद्द करण्याची मागणी स्थायी समिती सभेत विरोधकांनी केला. 

जळगाव ः शहरातील कचरा उचलण्याचे काम वॉटरग्रेसला ठेका दिला आहे. परंतु नियमित कचरा उचलला जात नाही. जो उचलला जातो; त्यात देखील माती टाकून वजन वाढविण्याचे काम होत आहे. शिवाय चार टन क्षमता असलेल्या डंपरमध्ये नऊ टन कचरा असल्याची नोंद केली जात असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत सफाईचा एकमुस्त ठेका रद्द करण्याची मागणी स्थायी समिती सभेत विरोधकांनी केला. 
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती ऍड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुठ्ठे, अजित मुठे, मिनीनाथ दंडवते, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुले, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते. सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व नऊ विषयांना मंजूरी देण्यात आली. तसेच स्थायी समितीची सभा दर शुक्रवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सभा झाल्यानंतर चोवीस तासात ठराव लिहून कार्यवाही करण्याचे आदेश सभापती ऍड. हाडा यांनी दिले. त्याचप्रमाणे शहरात साफसफाई होत नाही, घंटागाडी येत नाही. मार्केट परिसरात कचरा उचलला जात नसल्याबद्दल विष्णू भंगाळे यांनी नाराजी व्यक्‍त करत उपायुक्त मिनिनाथ दंडवते आणि आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना धारेवर धरले. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून आडमुठे धोरण सुरु असून कचऱ्यात माती टाकून वजन वाढविले जात असल्याचा आरोप भंगाळे यांनी केला. 

रेल्वे दादऱ्याच्या वापराबाबत पत्र द्या 
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र, अद्याप देखील पर्यायी मार्ग केलेला नाही. त्यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी उपस्थित केला. पर्यायी मार्ग नसल्याने नागरिक रेल्वे स्थानकाच्या दादऱ्याचा वापर करतात. त्याबाबत परवानगी देखील दिली आहे. तरीही विनातिकिट म्हणून नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला पत्र देण्याची मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली. 

ओव्हरलोडची परिवहन विभागाकडे तक्रार करणार ः बरडे 
कचरा संकलनासाठी लावण्यात आलेल्या डंपरची क्षमता पाच टनाची आहे. तरी नऊ टन कचरा कसे काय भरले जाते? असा सवाल उपस्थित करुन ठेकेदार लाखो रुपयाचा गैरव्यवहार करीत असल्याचा गौप्यस्फोट नितीन बरडे यांनी केला. कचऱ्याची ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसह परिवहन विभागाकडे करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muncipal corporation sthai samiti sabha kachra dhamper