महापालिकेचे अंदाजपत्रक अखेर पोचले 1,799 कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

स्थायीकडून 389 कोटींची भर - बीओटीच्या माध्यमातून प्रकल्प उभारणीस प्राधान्य; नव्या प्रस्तावाद्वारे वाढीचे संकेत

स्थायीकडून 389 कोटींची भर - बीओटीच्या माध्यमातून प्रकल्प उभारणीस प्राधान्य; नव्या प्रस्तावाद्वारे वाढीचे संकेत
नाशिक - महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये 389 कोटी रुपयांची भर घालत अंदाजपत्रक एक हजार 799 कोटी रुपयांवर पोचले आहे. 29 मेस महासभेच्या मान्यतेसाठी अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या तत्त्वानुसार प्रकल्पांची उभारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

महापालिका प्रशासनाने एक हजार 410 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात 875 कोटी 74 लाख रुपये महसुली खर्च दाखविण्यात आला होता. भांडवली कामांसाठी 130 कोटी रुपयांची तरतूद असल्याने विकासकामे करायची कशी, असा प्रश्‍न नगरसेवकांना पडला होता. पण स्थायी समितीने त्यावर उपाय शोधला असून, विविध योजनांचा समावेश करत 389 कोटींनी वाढ केली आहे.

त्यामुळे आता उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसविण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. महापालिकेकडे उपलब्ध होणारा निधी लक्षात घेता स्थायी समितीने बीओटीच्या माध्यमातून प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पन्नवाढीसाठी घरपट्टीमध्ये चौदा टक्के, तर पाणीपट्टीत पाच टक्के वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

नवा प्रस्ताव येण्याची शक्‍यता
नव्याने प्रस्ताव आला तरी नागरिकांना दिलासा देताना व्यावसायिक मिळकत व पाणीपुरवठा दरात वाढ होण्याची दाट शक्‍यता आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे वीस वर्षांपूर्वी विस्तारीकरण करताना सर्व्हिस रोड शासनाकडे वर्ग करण्यात आले होते. त्या सर्व्हिस रोडचे अनुदान शासनाकडून अद्यापही प्राप्त झाले नाही. त्यामुळे उत्पन्नात ते अनुदान प्राप्त होईल, असा अंदाज धरला आहे. शहरातील मोकळे भूखंड विकसित करणे, महापालिकेच्या शाळा इमारती भाडेतत्त्वावर देणे व शासनाकडून अनुदान मिळणार असल्याचे अपेक्षित धरण्यात आले आहे. जाहिरात फलकांच्या करात वाढ व अनधिकृत जोडण्या ठराविक दंड आकारून नियमित करून त्यातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे.

नगरसेवक निधीत वाढ
भांडवली खर्चासाठी शिल्लक राहणारा निधी व उत्पन्नाचे आटलेले स्रोत लक्षात घेऊन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नगरसेवक निधीला कात्री लावली होती. स्थायी समितीने मात्र नगरसेवकांना विकासकामांसाठी चाळीस लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार एका प्रभागासाठी एक कोटी 60 लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.

Web Title: municipal budget 1799 crore