कॅशलेस सुविधा मनपालाही "फलदायी'!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

धुळे - मालमत्ता कर अदा करण्यासाठी येथील महापालिकेने "पीओएस' (पॉइंट ऑफ सेल) मशिनची सुविधा उपलब्ध केल्याने मालमत्ताधारकांना ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कर वसुलीच्या दृष्टीने महापालिकेलाही ते फलदायीच ठरत आहे.

धुळे - मालमत्ता कर अदा करण्यासाठी येथील महापालिकेने "पीओएस' (पॉइंट ऑफ सेल) मशिनची सुविधा उपलब्ध केल्याने मालमत्ताधारकांना ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कर वसुलीच्या दृष्टीने महापालिकेलाही ते फलदायीच ठरत आहे.

मालमत्ता करासह महापालिकेचे अन्य कर भरण्यासाठी महापालिकेत "एचडीएफसी' बॅंकेने सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे कर थेट बॅंकेत जमा होतात. यापुढे जाऊन महापालिकेने सध्या "पीओएस' मशिन्सद्वारे कर अदा करण्याची सुविधाही सुरू केली आहे. "एटीएम' अथवा "डेबिट कार्ड' "पीओएस' मशिनवर स्वाइप करून कर अदा करता येतो. या सुविधेचाही अनेक मालमत्ताधारक उपयोग करत असल्याने लाखो रुपयांचे व्यवहार या माध्यमातूनही होत आहेत.

सुटीच्या दिवशी 50 हजार
रविवारी (ता. 12) सुटीच्या दिवशी करवसुली विभागात "पीओएस' मशिन्सद्वारे कर अदा करण्याची सेवा दुपारपर्यंत सुरू होती. सुटी असताना काही मालमत्ताधारक कर अदा करण्यासाठी महापालिकेत आले. त्यांनी एटीएम, डेबिट कार्डच्या माध्यमातून कर अदा केला. दुपारी बारा-साडेबारापर्यंत 49 हजार रुपयांचा भरणा यातून झाला होता. एटीएम, डेबिट कार्डद्वारे सहज, सोप्या पद्धतीने कर अदा करता येत असल्याने याला मालमत्ताधारकांचीही चांगला प्रतिसाद असल्याचे कर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

21 कोटींची करवसुली
महापालिकेने मालमत्ता कर शास्तीवर दोन टप्प्यांत सूट दिली. पहिल्या टप्प्यातील (50 टक्के) शास्ती माफीच्या काळात अर्थात 27 फेब्रुवारी ते 5 मार्चदरम्यान एकूण एक कोटी 60 लाख 64 हजार 759 रुपये करवसुली झाली. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील (25 टक्के) शास्ती माफीच्या काळात अर्थात 6 मार्च ते 12 मार्चदरम्यान 90 लाखांवर करवसुली झाली आहे. दरम्यान, एप्रिल 2016 ते 12 मार्च 2017 अखेर एकूण 20 कोटी 98 लाख 86 हजार 122 रुपये करवसुली झाली आहे.

तक्रारी दूर करण्याची गरज
अनेक मालमत्ताधारकांना चालू वर्षाची मागणी बिलेच मिळालेली नसल्याच्या तक्रारी आहेत. पाणीपट्टी बिलाबाबतही अशा तक्रारी आहेत. स्थायी समिती सदस्यांनीही हा प्रश्‍न सभेत उपस्थित केला होता. कर वसुलीसाठी फिरणारे काही कर्मचारी मालमत्ताधारकांच्या शंका-कुशंकांना सौजन्याने उत्तरे देत नसल्याच्याही तक्रारी आहेत. महापालिकेत कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा उपलब्ध करावी, अशीही मागणी आहे. या तक्रारी व त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: municipal cashless utility