महापालिकेतर्फे शहर बससेवेला तिलांजली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

जळगाव - महापालिकेच्या शहर बससाठी स्थानक नसल्याच्या नावाखाली बससेवा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. याशिवाय प्रत्येक महापालिकेत परिवहन समिती कार्यान्वित असावीच लागते, असा नियम असताना ती गेल्या तीन वर्षांपासून गठित करण्यात आलेली नाही. महापालिका प्रशासनही याबाबत सुस्त आहे. 

जळगाव - महापालिकेच्या शहर बससाठी स्थानक नसल्याच्या नावाखाली बससेवा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. याशिवाय प्रत्येक महापालिकेत परिवहन समिती कार्यान्वित असावीच लागते, असा नियम असताना ती गेल्या तीन वर्षांपासून गठित करण्यात आलेली नाही. महापालिका प्रशासनही याबाबत सुस्त आहे. 

शहर महापालिकेतर्फे नागरिकांसाठी बससेवा मोठ्या थाटात सुरू करण्यात आली होती. प्रारंभ प्रसन्न कंपनीतर्फे ही सेवा सुरू करण्यात आली. सुरवातीला या कंपनीने चागली सेवा दिली. परंतु महापालिकेने शहरात बसथांब्यासाठी या कंपनीला जागाच उपलब्ध करून दिली नाही. चित्रा चौकात रस्त्यावर या गाड्या उभ्या राहत होत्या. यातच कंपनी आणि महापालिका यांच्यात वाद निर्माण झाला आणि कंपनीने जळगावातून ही सेवा बंद केली. 

‘साई इन्फ्रास्ट्रक्‍चर’चीही माघार
प्रसन्न कंपनीने बससेवा बंद केल्यानंतर महापालिकेच्या तत्कालीन परिवहन समितीने पुन्हा निविदा काढल्या. त्यात जळगाव येथीलच साई इन्फ्रक्‍ट्रक्‍चर या कंपनीने मक्ता घेतला. मात्र त्यांनी सुरवातीपासून ही सेवा सुरू ठेवण्यास अनास्था दाखविली. मक्‍त्यात शहरात १५ बसेस सुरू करण्याचे दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र पाचच बसेस आणल्या. तीही सेवा व्यवस्थित सुरू न ठेवता अवघ्या वर्षभरात सेवा बंद केली. 

परिवहन समितीच बरखास्त
महापालिका स्थापन केल्यानंतर विविध विषय समित्या स्थापन कराव्या लागतात. नियमाप्रमाणे या समित्या स्थापन केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमानुसार महापालिकेचा कारभार चालतो. महापालिकेने या नियमालाच तिलांजली दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून चक्क परिवहन समितीच गठित केलेली नाही. तरीही महापालिकेचा कारभार कसा सुरू आहे, याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे.

केवळ आश्‍वासने; कार्यवाही शून्य
महापालिकेची परिवहन सेवा गठित करून शहरातील नागरिकांसाठी बससेवा सुरू करणे गरजेचे आहे. मात्र महापालिकेचे प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. जिल्हाधिकारी हेच महापालिकेचे प्रभारी आयुक्त आहेत.

त्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारताच ही समिती गठित करण्याची गरज होती. मात्र त्यांनीही या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेतील पदाधिकारीही जळगावकरांना ही सेवा देण्याबाबत कोणतीही हालचाल करण्यास तयार नाहीत. जळगावकरांना सुविधा देण्याचे पदाधिकाऱ्यांतर्फे आश्‍वासन दिले जाते. मात्र शहराचा विस्तार होत असताना बससेवेची सुविधा जळगावकरांना महापालिका देऊ शकत नाही, यास जबाबदार कोण? असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.

Web Title: municipal city bus service