आज ठरणार महापालिकेचा वारसदार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नाशिक - महापालिकेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात कुठल्या पक्षाच्या हाती सत्ता द्यायची याचा फैसला उद्या (ता. 21) दहा लाख 74 हजार मतदार मतपेटीतून देणार आहे. 122 जागांसाठी राष्ट्रीय पक्षांचे सहा, राज्यस्तरीय पक्षांचे चार व अपक्षांसह तेरा असे एकूण 23 राजकीय पक्षांचे एकूण 821 उमेदवार रिंगणात आहेत. अधिकाधिक मतदान पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील एक हजार 407 मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची प्रक्रिया होईल.

नाशिक - महापालिकेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात कुठल्या पक्षाच्या हाती सत्ता द्यायची याचा फैसला उद्या (ता. 21) दहा लाख 74 हजार मतदार मतपेटीतून देणार आहे. 122 जागांसाठी राष्ट्रीय पक्षांचे सहा, राज्यस्तरीय पक्षांचे चार व अपक्षांसह तेरा असे एकूण 23 राजकीय पक्षांचे एकूण 821 उमेदवार रिंगणात आहेत. अधिकाधिक मतदान पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील एक हजार 407 मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची प्रक्रिया होईल. शहरात 277 संवेदनशील, 77 अतिसंवेदनशील, तर क्रिटिकल 77 मतदान केंद्रे आहेत. चार जिल्ह्यांतील एकूण साडेसहा हजार पोलिस शहरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. 

मतदान करणे लोकशाहीत प्रथम कर्तव्य आहे. मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करून मतांचा टक्का वाढवावा. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. 
-अभिषेक कृष्णा, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी 

आचारसंहिता कक्षाचा व्हॉट्‌सऍप क्रमांक 
मतदानादरम्यान मतदारांना आमिष दाखविणे, मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करणे अशा घटना आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत. त्यामुळे कुठे नियमांचे उल्लघंन होत असल्यास आचारसंहिता कक्षाच्या वतीने व्हॉट्‌सऍप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. 7768002424 असा हा क्रमांक असून, घटनेचे व्हिडिओ चित्रण किंवा फोटो अपलोड केल्यास तत्काळ तेथे कारवाई केली जाणार असल्याचे आचारसंहिता कक्षप्रमुख सरिता नरके यांनी माहिती दिली. मतदानासंदर्भातील माहिती महापालिकेच्या www.nashikcorporation.co.in या वेबसाइटवर नागरिकांना पाहता येणार आहे. 

नावे शोधण्यासाठी 
मतदानाच्या दिवशी मतदारांना यादीत नावे शोधण्यासाठी nmcvotersearch.co.in साइट उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांतून मतदारांना नावे शोधता येणार आहेत. नावाची व आडनावाची पहिली तीन अक्षरे टाकल्यानंतर नावांची यादी मतदारांसमोर येते. त्यावरून बूथ क्रमांक, मतदान केंद्राची माहिती समोर येते. 

इंटरनेट सुरू राहणार 
मतदान संपेपर्यंत शहरातील इंटरनेट सुविधा बंद राहणार असल्याचे संदेश आज दिवसभर व्हॉट्‌सऍपवरून व्हायरल झाल्याने महापालिकेने याबाबत गंभीर दखल घेतली. विविध विभागांकडे चौकशी केल्यानंतर इंटरनेट बंद करण्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. त्यामुळे आज आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सोशल मीडियावरूनच इंटरनेट सेवा बंद असल्याच्या अफवेचा इन्कार करत सेवा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

निवडणुकीत महत्त्वाचे 
-2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 14 लाख 86 हजार 53. 
-31 प्रभागातील 122 जागांसाठी मतदान. 
-दहा लाख 74 हजार 691 मतदार बजावणार आपला हक्क. 
-पाच लाख 71 हजार 371 पुरुष मतदार, पाच लाख तीन हजार 320 महिला मतदार. 
-एक हजार 407 मतदान केंद्रांवर होणार मतदान. 
-निवडणुकीसाठी सात हजार 745 कर्मचारी नियुक्त. 
-821 उमेदवार रिंगणात. 

निवडणुकीत राजकीय पातळीवर 
-मनसेचे अस्तित्व ठरविणारी निवडणूक. 
-भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न. 
-शहरात शत-प्रतिशतसाठी भाजपचे प्रयत्न. 
-अपक्षांसह तेरा छोट्या पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई. 
-नऊ माजी महापौर रिंगणात. 
-शंभरहून अधिक आजी-माजी नगरसेवक रिंगणात. 

Web Title: Municipal Corporation election