
Dhule News : अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच; SSVPSसमोरील अतिक्रमणे हटविली
धुळे : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरात बुधवारी (ता. १) पुन्हा अतिक्रमण (Encroachment) निर्मूलनाची कारवाई केली. (Municipal Corporation encroachment removal team again took action to remove encroachments in city on 1 march dhule news)
पथकाने शहरातील वडजाई रोड भागातील एक पक्के बांधकाम जमीनदोस्त केले, तर शहरातील देवपूर भागात एसएसव्हीपीएस महाविद्यालयासमोर व परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली.
महापालिकेकडून सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चाळीसगाव रोड भागातील अतिक्रमणांवर महापालिकेने पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चाळीसगाव चौफुलीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा शंभरावर अतिक्रमणांवर जेसीबी फिरविला.
त्यानंतर ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाकडूनही करण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी देवपूर भागात एसएसव्हीपीएस महाविद्यालयासमोर व लगतच्या भागातील रस्त्यावरील २०-२२ अतिक्रमणे जेसीबीने हटविली. काही अतिक्रमणे संबंधितांनी स्वतः काढून घेतली. फळ, भाजीपाला विक्रेते, गॅरेज, चहा टपरी, मांसविक्रीची दुकाने, खाद्यपदार्थ आदी विविध अतिक्रमणांचा यात समावेश आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख प्रसाद जाधव संतोष घटी, युवराज खरात, जाकिर बेग, सनी दुर्धळे, राहुल फुलपगारे, मोहन गवळी, चालक भूषण अहिरे, राहुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील अतिक्रमणांबाबत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही महापालिकेच्या माध्यमातून सर्व अतिक्रमणे काढली जातील, असे सांगितले.
एसएसव्हीपीएस महाविद्यालयासमोर पुरातन महादेव मंदिर होते. आज ते मंदिर तेथे अस्तित्वात नाही. तेथे आज मांसविक्रीची दुकाने आहेत. हे पाप कुणाचे आहे, हा प्रश्न आहे. भाजपने शहरात काय कामे केली ते सर्वांना माहिती आहे. शंभर टक्के कामे होऊ शकत नाहीत. पण शहरात भाजप व शिंदे सरकारने कामे दिली आहेत. कुणाच्या सूचनेने शहरासाठी कामे दिलेली नाहीत, असेही त्यांनी मागील पत्रकार परिषदेत म्हटले होते.