आरोग्याबाबत मुलींना सजग करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

पौगंडावस्थेतील बदलाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समुपदेशन; तपासणीसह गरजेच्या वस्तूंचीही उपलब्धता

पौगंडावस्थेतील बदलाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समुपदेशन; तपासणीसह गरजेच्या वस्तूंचीही उपलब्धता

नाशिक - मनोरंजन विश्‍वातील विस्फोटामुळे पौगंडावस्थेत येण्याचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे मुलींच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने महापालिकेतर्फे पाचवी ते आठवीतील मुलींसाठी पौगंडावस्थेतील वयात काळजी घेण्यासंदर्भात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे समुपदेशन केले जात आहे. महापालिकेत दाखल होणाऱ्या बऱ्याचशा मुलींची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने गरजाधिष्ठित वस्तूंची खरेदी करण्याचीही आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे महापालिकेने अशा मुलींसाठी नखे कापणाऱ्या साधनांपासून अगदी खोबरेल तेल पुरविण्यापर्यंतची सोय उपलब्ध करून दिली आहे. दर वर्षी दोनदा महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी बंधनकारक करून मुलींना आरोग्याबाबत सजग करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

 

नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये एकूण साडेसोळा हजार मुली आहेत. मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे, यावरून सर्वसामान्य घरातील पाल्यांचा कल मुलींना शिकविण्याकडे असल्याचे दिसून येते. मुलींची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होत असल्याने शिक्षण समिती प्रशासनाने त्यासाठी धोरण आखले आहे. त्यात ‘बॉश’ व ‘महिंद्र’सारख्या कंपन्यांनीही सहभाग घेऊन सामाजिक दायित्व पार पाडले आहे. नन्ही कली या स्वयंसेवी संस्थेमार्फत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुलींची वर्षातून दोनदा वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यातून मुलींना काही आजार असल्यास तातडीने त्याचे निदान होऊन उपचार करता येणे शक्‍य होते. पौगंडावस्थेतील मुलींचे वय लक्षात घेऊन समुपदेशनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात मुलींना या वयात घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले जाते. भविष्यातील धोके व तोटे या बाबी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पटवून दिल्या जातात. नखे व केस वाढल्याने आरोग्यावर होणारे परिणाम, स्वच्छतेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच नखे कापण्यासाठी नेलकटर, तेल, कंगवे आदी वस्तूही महापालिकेतर्फे पुरविल्या जातात. पाचवी ते आठवीच्या मुलींना सॅनेटरी नॅपकीन पुरविण्यातही महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

 

तेरा व्हेंडिंग मशिन

महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींना सॅनेटरी नॅपकीन पुरविण्यासाठी व्हेंडिंग मशिन बसविले जाणार आहेत. बॉश कंपनीच्या सहकार्याने प्रारंभी १३ मशिन बसविले जातील. एक रुपयाचा कॉइन मशिनमध्ये टाकल्यास मुलींना सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध होईल, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.

Web Title: Municipal Corporation health initiative to alert the girls