esakal | धुळे शहर पून्हा कचऱ्याच्या विळख्यात; पर्यायी व्यवस्थेअभावी आली वेळ 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे शहर पून्हा कचऱ्याच्या विळख्यात; पर्यायी व्यवस्थेअभावी आली वेळ 

आठ-पंधरा दिवसापासून कचरा संकलनाचे काम ठप्प झाल्याचे दिसत आहे. शहराच्या विविध भागातील नागरिकांकडून घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी होत आहेत.

धुळे शहर पून्हा कचऱ्याच्या विळख्यात; पर्यायी व्यवस्थेअभावी आली वेळ 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः शहरातील कचरा संकलनाचे काम वॉटरग्रेस कंपनीकडून काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर काय स्थिती निर्माण होईल याचे चित्र स्पष्ट असताना महापालिका प्रशासनाला वेळेत पर्यायी व्यवस्था उभी करता आली नाही. परिणामी गेल्या साधारण पंधरा दिवसापासून शहरातील कचरा संकलनाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे विविध भागातील नागरिक त्रस्त आहेत. आता पर्यायी व्यवस्थेचा निर्णय घेण्यासाठी आज स्थायी समितीची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. 

आवश्य वाचा- घरावर पाळत ठेवली आणि चोरट्यांनी सायंकाळीच हातसफाई केली 

शहरातील कचरा संकलनाचे काम वॉटरग्रेस प्रॉडक्टस (नाशिक) यांना दिले होते. तीन वर्षासाठी १७ कोटीवर खर्चातून हे काम वॉटरग्रेसला देण्यात आले. मात्र संस्थेच्या कामाबद्दल तक्रारी वाढल्याने डिसेंबर २०२० अखेर या संस्थेचे काम थांबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. 

पूर्वकल्पना असताना दिरंगाई 
वॉटरग्रेस कंपनीकडून काम काढून घेण्याचे जवळपास निश्‍चित झाल्यानंतर व नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास काही निश्‍चित कालावधी लागेल हे महापालिकेच्या कारभाऱ्यांना माहीत असताना पर्यायी व्यवस्था उभी करण्यात महापालिकेचे कारभारी कमी पडल्याचे प्रथमदर्शनी दिसते. वॉटरग्रेसचे काम थांबविण्याचा निर्णय झाल्याने संबंधित संस्था त्यापूर्वीच या कामाचा बोजवारा उडवेल याची कल्पना यायला हवी होती. मात्र, तरीही याकडे गांभीर्याने लक्ष घातले गेले नाही असे दिसते. 

निम्म्या घंटागाड्या बंद 
गेल्या आठ-पंधरा दिवसापासून कचरा संकलनाचे काम ठप्प झाल्याचे दिसत आहे. शहराच्या विविध भागातील नागरिकांकडून घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. आजघडीला महापालिकेच्या एकूण ७९ घंटागाड्यांपैकी अधिकृतरीत्या ३१ घंटागाड्या दुरुस्तीसाठी वर्कशॉपला आहेत. काही घंटागाड्या सुरू असल्या तरी त्या नावालाच असल्याचे चित्र आहे. काही प्रभागांमध्ये एखाद-दुसरी घंटागाडी जाते. काही ठिकाणी मात्र एक-एक करत सर्वच घंटागाड्या आजघडीला बंद झाल्या आहेत. घंटागाड्यांच्या या स्थितीवरुनच कचरा संकलनाची स्थिती स्पष्ट होते. 

आवर्जून वाचा- पुरणपोळी, बिबडी, मेहरुण बोरांना ‘जीआय’ मानांकनाचा प्रस्ताव 
 

नव्या ठेकेदाराच्या अटी अशा 
कचरा संकलनाची पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी बुधवारी स्थायी समितीची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत २०१८ मध्ये झालेल्या निविदा प्रक्रियेतील दुसऱ्या क्रमांकाच्या (एल-२) निविदाधारकाला (रिलाएबल एजन्सीज, वसई, जि. पालघर) काम देण्याचा विषय ठेवला आहे. या एजन्सीने कामाच्या अनुषंगाने काही अटी-शर्तींच्या पूर्ततेची विनंती मनपाकडे केली आहे. यात कचरा संकलनासाठी महापालिका मालकीची वाहने देखभाल-दुरुस्ती करून, जीपीएस यंत्रणा सक्रिय करून संस्थेच्या ताब्यात द्यावी अथवा त्याचा मोबदला अदा करावा, मर्यादित कालावधीसाठी काम असल्याने शासकीय कराव्यतिरिक्त इतर कराची मागणी करू नये, देयक अदा करताना फक्त दोन टक्के टीडीएस कपात करावा, त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारची रक्कम कपात करू नये, इंधन दरातील तफावत (६७ रुपये ते ८० रुपये प्रती लीटर) लक्षात घेता शक्य असल्यास तफावतीची रक्कम अथवा पाच टक्के वाढ अथवा योग्य ती वाढ करावी आदी मागण्यांची विनंती रिलाएबल एजन्सीने केली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image