धुळे महापालिकेत संजय जाधव दुसऱ्यांदा सभापतिपदाच्या खुर्चीवर 

धुळे महापालिकेत संजय जाधव दुसऱ्यांदा सभापतिपदाच्या खुर्चीवर 

धुळे ः महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे नगरसेवक संजय जाधव यांची, तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी वंदना थोरात व उपसभापतिपदी शकुंतला जाधव यांची स्थायी समितीच्या विशेष सभेत बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती सभापतिपदी श्री. जाधव यांना १७ वर्षांनंतर पुन्हा विराजमान होण्याची संधी मिळाली. ते २००४- ०५ मध्ये अर्थात महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिले सभापती होते. 

महापालिका स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर गुरुवारी निवड प्रक्रिया होती. यासाठी सकाळी दहाला महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा झाली.

जिल्हाधिकारी संजय यादव पीठासीन अधिकारी होते. आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. प्रथम स्थायी समिती सभापतिपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. स्थायी समिती सभापतिपदासाठी श्री. जाधव एकमेव उमेदवार असल्याने श्री. यादव यांनी त्यांची निवड घोषित केली. साडेदहाला महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापतिपदासाठी निवड प्रक्रिया झाली. या दोन्ही पदांसाठीही प्रत्येकी एका उमेदवाराचे अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी यादव यांनी सभापतिपदी श्रीमती थोरात व उपसभापतिपदी श्रीमती जाधव यांची निवड झाल्याचे घोषित केले. नवनिर्वाचित तिन्ही पदाधिकाऱ्यांचा पीठासीन अधिकारी श्री. यादव, आयुक्त अजीज शेख यांनी सभागृहात, तर खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी पदाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन सत्कार केला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. 

सोळा- सतरा वर्षांनंतर पुन्हा एकदा स्थायी समितीच्या सभापतिपदाची संधी मिळाली. या पदाच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेता असताना, महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता, जागा ताब्यात घेण्यासाठी जे प्रयत्न सुरू केले ते काम पुढे नेऊ व वर्षभरात सर्व मालमत्ता ताब्यात घेऊ, त्याशिवाय चैन पडणार नाही. पाणीपुरवठा, रस्त्यांच्या समस्याही सोडवू. महापालिकेशी संबंधित ज्या तक्रारी यापूर्वी केल्या, त्या मागे घेणार नाही. बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत संबंधितांवर कारवाईचा प्रयत्न असेल. 
-संजय जाधव, नवनिर्वाचित सभापती, स्थायी समिती 

पक्षनेते व पदाधिकाऱ्यांनी जो विश्‍वास व जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, ती पार पाडण्याचा प्रयत्न असेल. 
-वंदना थोरात, नवनिर्वाचित सभापती, महिला बालकल्याण समिती 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com