स्थायी समितीच्या सभेत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महिला थेट सभागृहात
मोगलाई भागातील लक्ष्मीनगर, मशिदीच्या पाठीमागील भागातील अनेक घरांना अनियमित पाणीपुरवठा होतो. रात्री एकला पाणी येते.
धुळे ः अनियमित व रात्री-अपरात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या घेऊन मोगलाई भागातील काही महिलांनी मंगळवारी थेट स्थायी समितीच्या सभेत घुसून प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी नंतर सभागृहाबाहेर जाऊन समस्या जाणून घेत ती सोडविण्याचे आश्वासन दिल्याने संतप्त नागरिक माघारी फिरले. ज्या नागरिकांनी हे आंदोलन केले ते स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांच्याच प्रभागातील होते.
धुळे महत्वाची बातमी- झटपट श्रीमंतीच्या नादात अनेक तरुण लागले गैरमार्गाला
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा मंगळवारी सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात सुरू होती. सभेदरम्यान अचानक काही नागरिक घोषणाबाजी करत सभागृहाकडे आले. घोषणा देतच त्यांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. काही महिला दरवाजातून आत घुसल्याही होत्या. मात्र, सभापती बैसाणे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू असताना, अशा प्रकारे निवेदनकर्ते अथवा मोर्चेकऱ्यांना सभागृहात प्रवेश देऊ नये, असे बजावल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कसरत करत आंदोलकांना सभागृहाबाहेर काढले. नंतर अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले व इतरांनी बाहेर जाऊन आंदोलकांची समस्या जाणून घेतली. दरम्यानच्या काळात सभापती बैसाणे यांनी अशा प्रकारे यापुढे निवेदनकर्ते अथवा मोर्चेकरी सभागृहात आले, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करेन, असा इशारा दिला.
आवर्जून वाचा-
आंदोलकांची कैफियत
मोगलाई भागातील लक्ष्मीनगर, मशिदीच्या पाठीमागील भागातील अनेक घरांना अनियमित पाणीपुरवठा होतो. रात्री एकला पाणी येते. शिवाय ती वेळही निश्चित नसल्याने रात्री एक ते पहाटे चारपर्यंत पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. अनेक घरांपर्यंत पाणीच पोचत नाही, अशा महिलांच्या तक्रारी होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीसाठी येतो, समस्या सोडवतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक माघारी फिरले.
संपादन- भूषण श्रीखंडे