महापालिका निवडणूक एप्रिलअखेर शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

मालेगाव - येथील महापालिका निवडणुकीचे वेध पक्षांना लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बैठका, चौक सभांबरोबरच आंदोलनांना धार आली आहे. आठवड्यात प्रारूप मतदारयादी जाहीर होऊन मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. प्रारूप मतदारयादीस उशीर होत असल्याने निवडणूक एप्रिलअखेर होण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. 

सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत व प्रभागरचना झाली आहे. आयोगाच्या नियोजित कार्यक्रमानुसार 27 फेब्रुवारीला मालेगावसह सहा महापालिकांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार होती. नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांतील कामकाजात संबंधित महापालिकांचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त होते. त्यामुळे संबंधितांनी प्रारूप मतदारयादी प्रसिद्धीसाठी मुदत वाढवून मागितली. ती मान्य करत आयोगाने नियोजित कार्यक्रम स्थगित केला. निवडणूक आयोगाने आज प्रारूप मतदारयादी कामाच्या प्रगतीसंदर्भात सर्व सहा महापालिका आयुक्तांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे माहिती जाणून घेतली. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यासंदर्भात सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. 2012 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 15 एप्रिलला झाले होते. या वेळी एप्रिलअखेर निवडणूक होईल, असा अंदाज आहे. 

शनिवारी प्रशिक्षण कार्यशाळा 
महापालिका प्रशासनाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांना रोजचा खर्च सादर करण्यासंदर्भात माहिती व्हावी यासाठी शनिवारी (ता. 4) प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. येथील छत्रपती शिवाजी टाउन हॉलमध्ये दुपारी तीनला कार्यशाळा होईल. उमेदवारांना निवडणूक खर्च भरण्यासाठी 'True Voter' र्ल ऍप्लिकेशन वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणाला संभाव्य उमेदवार, राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र जगताप यांनी केले आहे. 

Web Title: The municipal election in April last possible