खोडेच ठरविणार महापालिकेतील खोडेंची ‘एंट्री’

विक्रांत मते
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
नाशिक - महापालिकेच्या राजकारणात वडाळा गावापासून इंदिरानगरपर्यंत एकेकाळी खोडे कुटुंबीयांचे वर्चस्व होते. मागील निवडणुकीत खोडे कुटुंबीयांच्या वर्चस्वाला पराभवामुळे धक्का बसला. यंदा पुन्हा सत्तेचे वैभव मिळविण्यासाठी त्या कुटुंबाला धडपड करावी लागत आहे. एकमेकांचे नातेवाईक असलेले खोडे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने खोडेच ठरविणार महापालिकेतील खोडेंची ‘एंट्री’, असे सध्याचे चित्र आहे.

उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
नाशिक - महापालिकेच्या राजकारणात वडाळा गावापासून इंदिरानगरपर्यंत एकेकाळी खोडे कुटुंबीयांचे वर्चस्व होते. मागील निवडणुकीत खोडे कुटुंबीयांच्या वर्चस्वाला पराभवामुळे धक्का बसला. यंदा पुन्हा सत्तेचे वैभव मिळविण्यासाठी त्या कुटुंबाला धडपड करावी लागत आहे. एकमेकांचे नातेवाईक असलेले खोडे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने खोडेच ठरविणार महापालिकेतील खोडेंची ‘एंट्री’, असे सध्याचे चित्र आहे.

१९९२ च्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत (कै.) गंगाधर खोडे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. १९९७ मध्ये चंद्रकांत खोडे यांनी शिवसेनेकडून निवडणुकीत उडी घेतली. नंतर सलग तीन टर्म ते नगरसेवक राहिले. खोडे कुटुंबातील सुनील यांनी १९९७ मध्ये एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली, त्या वेळी अपयश पदरात पडले. २००२ च्या निवडणुकीत पत्नी सुप्रिया यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली, त्यांनाही पराभव स्वीकाराला लागला. २००७ मध्ये सुनील यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविताना विजय मिळविला. २०१२ मध्ये आरक्षणामुळे खोडे कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसला. त्यातून सावरण्यासाठी सुनील यांनी पत्नी सुप्रिया यांना, तर चंद्रकांत यांनी पत्नी मनीषा यांना निवडणुकीत उतरविले. मात्र, दोघांचाही पराभव झाला. सुरवातीला सुनील माधव खोडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविली. भाजपचे सतीश कुलकर्णी यांनी त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला. खोडे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील आकाश यांनी २०१२ मध्ये प्रभाग ५४ मधून निवडणूक लढविली, त्यांचाही पराभव झाला. यामुळे खोडे कुटुंबीयांचा पराभवाचा सिलसिला कायम राहिला.

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
महापालिकेच्या राजकारणात २०१२ पर्यंत खोडे कुटुंबीयांचे वर्चस्व होते. मात्र, पराभवाच्या मालिकेमुळे वर्चस्व संपुष्टात आले. आता पुन्हा नव्या दमाने निवडणुकीच्या तयारी ते लागले आहेत. खोडे कुटुंबाच्या पराभवासाठी विरोधकांची गरज नाही. एकमेकांना पराभूत करण्यास ते स्वत:च सक्षम असल्याचे या भागात बोलले जाते. (कै.) गणपतराव काठे हयात असताना खोडे कुटुंबाचे संबंध चांगले होते. (कै.) काठे सांगतील तोच शब्द अंतिम मानला जायचा. मात्र, खोडे कुटुंबातील प्रत्येकाचीच राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्याने स्पर्धाही वाढली व त्यातून राजकीय संघर्ष उभा राहिला. सध्या चंद्रकांत खोडे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून मनसेत प्रवेश केला. सध्या ते भाजपवासी झाले आहेत. माजी आमदार वसंत गिते यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे चंद्रकांत यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी गिते यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दुसरीकडे सुनील परशराम खोडे पूर्वीपासून भाजपमध्ये आहेत. शिवाय, विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे ते समर्थक असल्याने सौ. फरांदे यांची प्रतिष्ठा सुनील व त्यांच्या पत्नी सुप्रिया यांच्यासाठी पणाला लागणार आहे. त्यामुळे प्रभाग २३ व ३० मध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच होणार असल्याचे तूर्तास दिसते. भाजपमधील सुनील व चंद्रकांत यांच्यातील स्पर्धेतून शिवसेनेने राजकीय मुत्सदेगिरीचा भाग म्हणून सुनील माधव खोडे यांना पक्षात घेतले आहे. शिवसेनेकडून ते उभे राहण्याची शक्‍यता आहे. आकाश खोडे त्यांच्या मातोश्री शकुंतला यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

Web Title: municipal election in nashik