गाळेधारकांना पंधरा दिवसांचा ‘अल्टिमेटम’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

जळगाव - महापालिकेच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळेधारकांना बजावलेली भाडे, मालमत्ताकराची बिले थकीत असून, ती पंधरा दिवसांत भरावी, असा ‘अल्टिमेटम’ महापालिका प्रशासन देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नव्या अधिनियमाचा दिलासा मिळणार नाही. हे स्पष्ट होताच आता गाळेधारकांसमोर पंधरा दिवसांत मोठ्या रकमा भराव्या लागणार आहेत. सोबतच गाळेधारकांना तीन महिन्यांच्या बिलांचे वाटप करण्यात येणार असून, गाळेजप्तीच्या कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत.

जळगाव - महापालिकेच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळेधारकांना बजावलेली भाडे, मालमत्ताकराची बिले थकीत असून, ती पंधरा दिवसांत भरावी, असा ‘अल्टिमेटम’ महापालिका प्रशासन देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नव्या अधिनियमाचा दिलासा मिळणार नाही. हे स्पष्ट होताच आता गाळेधारकांसमोर पंधरा दिवसांत मोठ्या रकमा भराव्या लागणार आहेत. सोबतच गाळेधारकांना तीन महिन्यांच्या बिलांचे वाटप करण्यात येणार असून, गाळेजप्तीच्या कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या गाळेकरारासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिनियमात सुधारणा करणार असल्याचे सांगितले. परंतु, त्याचा लाभ शहरातील गाळेधारकांना मिळणार नसल्याने २०१२ पासून गाळाभाडे थकीत असल्याने ते भरल्याशिवाय पर्यायच नसल्याची बाब समोर येत आहे. त्यातच आता २०१८ या वर्षाचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांचे गाळेभाडे, मालमत्ताकराचे बिले गाळेधारकांना आज वाटप करण्याची सुरवात किरकोळ वसुली विभागाकडून करण्यात आली. थकीत बिलांची रक्कम पंधरा दिवसात भरण्याचा ‘अल्टिमेटम’ प्रशासन गाळेधारकांना देणार असल्याचे माहिती समोर येत आहे. 

मेपासून गाळे जप्तीचे संकेत 
थकीत बिलांचे रक्कम भरण्यासाठी महापालिका गाळेधारकांना पंधरा दिवसाची मुदत देणार आहे. त्यातच गाळ्यांच्या लिलाव प्रक्रिया करण्यासाठी गाळे जप्तीची कारवाई आधी करावी लागणार आहे. त्यामुळे १ मेपासून गाळे जप्तीची कारवाई प्रशासनाकडून होण्याची शक्‍यता आहे. 

६० लाखांच्या बिलांचे वाटप 
१८ व्यापारी संकुलातील २ हजार ३८७ गाळेधारकांना तीन महिन्याच्या बिलांचे वाटप करण्याच्या प्रक्रियेला आज सुरवात झाली. फुले मार्केटमधील गाळेधारकांना आज ६० लाखाचे बिलांचे वाटप करण्यात आले. तर चालू वर्षातील तीन महिन्यांच्या (जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०१८) बिलातून गाळेधारकांकडून २ कोटी ९० लाख मालमत्ता कर, १ कोटी ८० लाख गाळेभाडे येणे अपेक्षित आहे. 

मालमत्तांवर बोझा चढविणार 
गाळेधारकांनी गाळेभाडे, मालमत्ताकराचे थकीत बिल दिलेल्या मुदतीत न भरल्यास महापालिका गाळेजप्तीची कार्यवाही करणार आहे. त्यासोबत थकबाकीदार गाळेधारकांच्या मालमत्तांवर बिलातील थकीत रकमेचा बोझा चढविला जाणार आहे. 

गाळेधारक निवडणुकीत करणार शक्तिप्रदर्शन  
महापालिकेच्या ई-लिलावाविरोधात गाळेधारक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. महापालिकेच्या २० संकुलांमधील गाळेधारकांसह इतर व्यापारी, दुकानदार, कर्मचारी यांच्या कुटुंबातील मतदारांची यादी तयार करून गाळेधारकांच्या बाजूने जो उभा राहणारा त्यालाच गाळेधारक मतदान करणार असल्याचा निर्णय आज गाळेधारक संघटनेच्या बैठकीत झाला.

छत्रपती शाहू महाराज सभागृहात गाळेधारक संघटनेची बैठक आज शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत महापालिकेच्या धोरणाचा निषेध करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकीच्या काळात गाळेधारक, व्यापारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे चाळीस ते पन्नास हजार मतदानाची नवीन यादी गाळेधारक संघटनेकडून तयार करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीत जो गाळेधारकांच्या बाजूने उभा राहील, त्यालाच मतदान केले जाईल, असे संकेत या बैठकीतून संघटनेने दिले. यावेळी हिरानंद मंधवाणी, राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, रमेश मतानी, तेजस देपुरा, राजेश पिंगळे, पंकज मोमाया, वसीम काझी, राम भागवाणी, राजेश वरयानी, सुजित किनगे, राजेश समदाणी, राजेंद्र शिंपी, बाळासाहेब पाटील, भागवत मिस्तरी, प्रदीप श्रीश्रीमाळ, सुनील गगडाणी, दिपक मंधान हे उपस्थित होते.

लिंकद्वारे मतदार यादी 
शासनाचे चुकीचे धोरण, तसेच महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षातर्फे घेतलेल्या धोरणाबाबत गाळेधारक संघटनांनी आता आगामी निवडणुकीतून विरोध करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गाळेधारक, व्यापारी, सर्व कर्मचाऱ्यासह कुटुंबातील मतदार सदस्यांची नवीन मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. लिंक तयार केली असून, इतरांना मॅसेज पाठवून पहिल्या टप्प्यात यादी तयार करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. 

Web Title: municipal shopping complex property bill arrears