नियमबाह्य प्रभागरचना नव्याने करावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

ब्लॉक पद्धतीनुसार रचना
महापालिका प्रशासनाने येत्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना ती २०११ च्या जनगणनेनुसार ब्लॉक पद्धतीने केली आहे. जनगणनेनुसार आवश्‍यक सदस्यसंख्या, त्या-त्या भागातील लोकसंख्या, लोकसंख्येची घनता यानुसार ही रचना करण्यात आली असून, संपूर्ण शहरात प्रत्येकी चार वॉर्डांचे १८ प्रभाग व १९ वा प्रभाग तीन वॉर्डांचा आहे. मात्र, या पद्धतीवरच काही सदस्य, नागरिकांचा आक्षेप आहे. २००८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्याप्रमाणे प्रभागरचना होती, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शहरातील विविध भागांची भौगोलिक रचना, रेल्वेमार्ग, महामार्ग, नाले अशाप्रकारचे अडथळे रचना तयार करताना विचारात घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नसल्याने संपूर्ण प्रभाग रचनेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

जळगाव - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर प्रभाग रचना सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, कोणतीही भौगोलिक स्थिती लक्षात न घेता ही रचना करण्यात आल्याची टीका होत आहे. अशातच आज ही प्रभाग रचना अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती प्राप्त झाल्या. ही प्रभाग रचना नियमांचे उल्लंघन करणारी असून, संपूर्ण प्रभाग रचनाच नव्याने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने गेल्या आठवड्यात प्रारूप प्रभाग रचना जाहीर करत आरक्षण सोडत काढली. तर आज अधिकृतपणे प्रभाग रचना जाहीर करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह पाच जणांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रभाग रचना तयार करताना नियमांचे उल्लंघन झाले असून, नव्याने प्रभाग रचना करावी, अशी हरकत घेण्यात आली आहे.

महापालिकेच्या २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचनेवर ९ ते २४ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त कार्यालय आणि चारही प्रभाग समिती कार्यालयात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

प्राप्त होणाऱ्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्त कार्यालयात पाच हरकती प्राप्त झाल्या असून, प्रभाग समिती कार्यालयामध्ये एकही हरकत अर्ज प्राप्त झालेला नाही. 

हरकतीचे स्वरूप असे
प्रारूप प्रभाग रचनेवर विद्यमान अपक्ष नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी हरकत घेत नव्याने प्रभागरचना करावी, अशी मागणी केली आहे. शेख फिरोज शेख हुसेन, याकूब दाऊत खान, खलिल बशीर पठाण यांच्यासह काही नागरिकांनी प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील रचनेसंदर्भात हरकत घेतली आहे. इंदिरानगर, श्रीपतनगर, नया फैल हा भाग प्रभाग क्रमांक सहामध्ये जोडण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. तर नीलेश तायडे यांनी अनुसूचित जमाती आरक्षणाबाबत हरकत घेतली आहे.

Web Title: municipal ward structure administrative