बिअर पाजून रवींद्रला संपविले; संशयितांची कबुली

दीपक कच्छवा
गुरुवार, 19 जुलै 2018

खुनाचा 'मास्टर माईंड' जाळ्यात येणार 
रवींद्रच्या खुनाचा प्लॅन करणारा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या रडारवर आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. त्यामुळे तो लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येईल, अशी माहिती मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी दिली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बिअर पाजून रवींद्रला संपविणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या खुनामागील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार असून, त्याच्या मागावर पोलिस आहेत. रवींद्रचा खून करण्यासाठी त्याचा सख्खा मावसभाऊ त्याचा वैरी निघाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. 

कृष्णापुरी (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र जाधव या बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल 37 दिवसांनी पोलिसांच्या हाती लागला. त्याचे मारेकरी संशयित आरोपी राहुल जाधव, हिंमत ऊर्फ अजय जाधव व सचिन जाधव यांना पोलिसांनी कालच अटक केली होती. 

बिअर पाजून टामी मारली 
रवींद्रला 11 जूनला राहुल जाधव, हिंमत ऊर्फ अजय चव्हाण व सचिन जाधव या तिघांनी रात्री साडेआठला फोनवरून घराबाहेर बोलविले. "आपल्याला पार्टी करायची आहे, सोबत चल' असे सांगून त्याला सोबत नेले. सर्वांनी "किंगफिशर बिअर' घेतली. रवींद्रला ती पाजली. ते सर्व बसलेले असताना एकाने रवींद्रला मुलीच्या प्रेमप्रकरणावरुन विचारले, की "तू आपल्या आपल्यात असे का करतोय?' असे म्हणत त्यांनी त्याच्या डोक्‍यात लोखंडी टामी मारली व त्यातच त्याचा जीव गेला. तिघांनी त्याच ठिकाणी खड्डा खोदून रवींद्रला बुजले. त्यामुळे तब्बल 37 दिवस त्याचा मृतदेह जमिनीत होता. तपासाधिकारी शालिग्राम कुंभार व कमलेश राजपूत यांनी या खुनाचा छडा लावला. 

मावसभाऊ झाला वैरी 
रवींद्रचा खून करण्यासाठी त्याचा सख्खा मावसभाऊ हिंमत ऊर्फ अजय चव्हाण हा देखील त्या दिवशी रवींद्र सोबत होता. त्याने आपल्या मावसभावाला संपविण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे रवींद्र केवळ त्याचा मावसभाऊ हिंमत सोबत असल्याने मोठ्या विश्‍वासाने दोघांसोबत गेला होता. बिअर प्यायल्यानंतर ज्याला ठार मारायचे आहे, तो रवींद्र आपला सख्खा मावसभाऊ आहे याचेही त्याला भान राहिले नाही. 

खुनाचा 'मास्टर माईंड' जाळ्यात येणार 
रवींद्रच्या खुनाचा प्लॅन करणारा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या रडारवर आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. त्यामुळे तो लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येईल, अशी माहिती मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी दिली.

Web Title: murder case in Chalisgaon