तिन्ही मुलांना मारलं; बायकोचाही काटा काढणार होतो, पण...

संजय भागवत
रविवार, 29 जुलै 2018

सायखेडा - एक पस्तीसवर्षीय तरुण धावतपळत तीन दिवसांपूर्वी नांदगाव पोलिस ठाण्यात आला.

सायखेडा - एक पस्तीसवर्षीय तरुण धावतपळत तीन दिवसांपूर्वी नांदगाव पोलिस ठाण्यात आला. ‘साहेब, मी माझ्या बायकोला नेण्यासाठी निफाडहून आलो, पण मला बायकोने आणि नातेवाइकांनी खूप मारले हो.’ त्याचे केविलवाणे भाव पाहून नांदगावचे पोलिस निरीक्षक शेख यांनी त्याची विचारपूस करताच तो सांगू लागला, की साहेब, मी आठ दिवसांपूर्वी माझ्या तीन मुलांना नांदूरमध्यमेश्वर धरणात बुडून मारलं; आता बायकोला गोड बोलून घरी नेऊन तिचाही काटा काढणार होतो, पण माझा प्लॅन फसला आणि त्यांनी सर्वांनी मला बेदम मारलं.’ हे ऐकताच पोलिस निरीक्षक शेख यांच्यासह सर्वच अवाक्‌ झाले अन्‌ पोलिस जसे या प्रकरणात तपास करत गेले, तर त्याचा शेवट तर चित्रपटाच्या कथानकापेक्षाही भन्नाट निघाला आणि पोलिसांच्या पदरी निव्वळ मनस्ताप आला. मुलं जिवंतच होती; परंतु मानवी स्वभावाचा वेगळा चेहरा पोलिसांचीच परीक्षा घेऊन गेला. नांदगाव पोलिस ठाण्यात सुरू झालेले हे कथानक सायखेडा पोलिसांशी जोडले गेले आणि त्याचे एक-एक पदर उलगडताना पोलिसांची भागमभाग केली. 

तरुणाने तीन मुलांना मारल्याचे सांगताच नांदगाव पोलिस ठाण्याचे शेख यांनी घटनास्थळ सायखेडा पोलिस ठाण्यांतर्गत असल्याने सायखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अंबादास मोरे यांना दूरध्वनी करत सारा प्रकार कथन केला. तिहेरी खुनाची (ट्रिपल मर्डर) केस असल्याने तेही सावध झाले.

नांदगाव पोलिसांनी ‘त्याला’ २५ जुलैला रात्री बाराला सायखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची चौकशी केली असता तो निफाड येथे राहणारा असून, नांदूरमध्यमेश्‍वरला मासेमारी करण्यासाठी जात असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीत बायको नांदत नसल्याने वैतागून नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पायथ्याजवळ १७ जुलैला एक-एक करत मुलांना पाण्यात ढकलून दिल्याचे सांगितल्याने पोलिस त्याला लगेच घटनास्थळी घेऊन गेले. तेथेही त्याने घटनास्थळी मुलांना कशाप्रकारे मारले, हे निर्विकार चेहऱ्याने सांगितले.

नेमका त्याचदिवशी तेथे गोदावरीला पूर आला होता. अतिशय थंड डोक्‍याने मुलांना मारल्याने सायखेडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. मुलांना मारल्यानंतर दोन दिवसांनी पश्‍चात्ताप झाल्याने मुलांचे मृतदेह शोधण्यासाठी नदीकाठावर शोधही घेतल्याचे सांगताच पोलिस तर अवाक्‌च झाले. पोलिसांनी परत त्याला ठाण्यात आणले. ‘तू नांदगावला कशाला गेला होता’, हा प्रश्‍न मोरे यांनी विचारताच ‘साहेब, माझी बायको घर सोडून गेली होती. तिचा शोध वणीजवळ असलेल्या गावी सासुरवाडीला घेतला. तेथे दिसली नाही. त्यानंतर मला समजले, की ती माझ्या नातेवाइकांकडे नांदगाव येथे आहे. तेथेही मी तिला शोधण्यासाठी गेलो, तर माझ्या नातेवाइकांनी व बायकोने मारहाण केली. तिला गोड बोलून घरी आणून काटा काढायचा होता, पण प्लॅन फसला.’ त्याच्या तोंडून हा घटनाक्रम ऐकल्यानंतर सायखेडा पोलिसांनी लगेच त्याच्या बायकोला व नातेवाइकांना आणले. तिच्या चौकशीत नवऱ्याने आपल्या तीन मुलांना मारल्याचं तिला माहीतच नव्हतं. तिला नवऱ्याचे कृत्य समजताच तिच्या आक्रंदनाने पोलिस ठाणेही हादरले. तिनं रडतरडत सांगितले, की साहेब, तिन्ही मुलांना मी नांदगावजवळील आश्रमशाळेत टाकले होते. तेथून नवरा घेऊन आला तेव्हापासून मुलांबद्दल काही माहिती नाही. तिने हे सांगताच तिहेरी खून (ट्रिपल मर्डर) झाल्याचे जणूकाही शिक्कामोर्तब झाले आणि पोलिस तपासाच्या कामाला लागले. 

सायखेडा पोलिसांनी वरिष्ठांना तिहेरी खुनाबाबत कळवताच रात्रभर चौकशी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी २६ जुलैला सकाळी सायखेडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले. मुलांचे मृतदेह शोधायचे कसे याविषयी खल सुरू झाला. आठ दिवसांपूर्वीची घटना तो सांगत असल्याने आता शोध घ्यायचा कसा यासाठी दोन टीम तयार केल्या गेल्या. 

नदीच्या दोन्ही काठांवर शोध घेण्याचे ठरले. तोपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सहज पुन्हा त्याची चौकशी केली आणि तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, ‘‘साहेब, मुलं जिवंत आहेत. मी त्यांना मारलंच नाही. 

बायको मुलं घेऊन जाईल म्हणून मी हे सर्व रचलं.’’ त्याच्या या वाक्‍याने मोरेंना धक्काच बसला. एकीकडे मुलं जिवंत असल्याचं समाधान व त्याने विनाकारण रात्रभर त्रास दिल्याचा संताप त्यांच्याही चेहऱ्यावर व्यक्त होत होता. त्याच्या या गौप्यस्फोटानंतर स्वतः मोरेंनी पोलिसांसह धावतपळत निफाडजवळील आश्रमशाळा गाठली आणि तेथे तिन्ही मुलांना पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला. पुन्हा माघारी आल्यानंतर त्याच्या बायकोला व नातेवाइकांना मोरे यांनी बसभाडे देऊन घरी पाठविले. पोलिसांना खोटी माहिती दिल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करत एका थरारनाट्यावर पडदा पडला.

तो ज्या पद्धतीने घटनेबाबत सांगत होता ते पाहून त्याने आपल्या तीन मुलांना खरंच मारलं असेल, असं वाटत होतं. बायकोने मुलांना घेऊन जाऊ नये म्हणून त्याने बनाव रचला होता. त्याची मुलं जिवंत पाहून आम्हाला हायसं वाटलं; परंतु मानवी मानसिकतेचा एक वेगळाच अनुभव देऊन गेला.
- अंबादास मोरे, पोलिस निरीक्षक, सायखेडा 

पती मला रोज मारहाण करायचा. त्यास वैतागून मी त्याला न सांगताच नातेवाइकांकडे गेले. मुलांना मारल्याचे समजताच मी घाबरले, पण मुलं जिवंत पाहून समाधान वाटलं. मला नवऱ्याने खूप त्रास दिला.
- ‘त्या’ तरुणाची पत्नी

Web Title: murder crime wife husband police