रामवाडीत युवकाचा निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

किशोर नागरे मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरील पटांगणात उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून चार तरुण तोंडाला रुमाल बांधून आले. किशोरला सावध होण्याच्या आतच संशयितांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी सपासप वार केले.

नाशिक : रामवाडीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार संशयितांनी 26 वर्षीय युवकाला धारदार हत्यारांनी वार करीत निर्घृणपणे खून केला. किशोर रमेश नागरे (26, रा. विश्‍वास चांगले यांच्या खालीत, रामनगर, रामवाडी, पंचवटी) असे मृत युवकाचे नाव असून तो, गुणाजी जाधव खूनप्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. त्याच पार्श्‍वभूमीतून त्याचा खून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयितांचा पोलिस शोध घेत असून याप्रकरणी पंचवटी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबारा-एक वाजेच्या सुमारास घडली. मृत किशोरचा भाऊ सचिन रमेश नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किशोर नागरे मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरील पटांगणात उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून चार तरुण तोंडाला रुमाल बांधून आले. किशोरला सावध होण्याच्या आतच संशयितांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी सपासप वार केले. छाती, पोट, मान, पाठीवर गंभीर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. गंभीररित्या जखमी झालेला किशोर जागेवरच कोसळल्यानंतर संशयितांनी पोबारा केला. सदरची बाब लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी जखमी किशोरला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. 

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, परिमंडळ दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, सहाय्यक आयुक्त शांताराम पाटील, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत किशोर नागरे याची माहिती घेत, संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी (ता.11) पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिटचे शोधपथके आणि पोलिस ठाण्याची शोधपथके तयार करण्यात आली. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही माहिती लागू शकलेली नाही. याप्रकरणी पहाटे अज्ञात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
टोळी युद्धातून खून -
किशोर नागरे आणि परेश मोरे यांच्यात बाचाबाची झाल्याने, त्यासंदर्भात 16 सप्टेंबर 2015 रोजी रात्री ठक्कर बाजार बसस्थानकाशेजारील हॉटेल तुळजा येथे किशोर नागरे, गुणाजी जाधव आणि त्यांचे साथीदार मद्यपान करून जेवण करीत होते. त्यावेळी संशयित परेश मोरे, व्यंकटेश मोरे व त्यांचे साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी धारदार हत्यारांनी हल्ला चढविला. यात गुणाजी जाधव याचा खून झाला तर किशोर नागरे गंभीर जखमी झाला होता. याच खून प्रकरणातील किशोर नागरे मुख्य साक्षीदार होता. त्यामुळे त्याच्या खूनामागे हेच कारण असण्याची शक्‍यता आहे. व्यंकटेश मोरे सध्या अनेक गुन्ह्यांमध्ये कारागृहात आहे. गुन्हेगारांच्या टोळीयुद्धातून सदरचा प्रकार घडल्याची शक्‍यता आहे.

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Murder of a young boy in Ramvadi