
स्मार्टसिटीच्या धर्तीवर पोलिस ठाणे स्मार्ट करण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्तालयांकडून सुरू आहे. त्यानिमित्ताने पोलिस ठाण्यात एलईडी स्क्रीन बसविण्यात आला. नोंदणी संगणकीकृत केल्या. गुन्ह्याची ऑनलाइन माहिती होऊ लागली. आता पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिसांवरील कामाचा तणाव काहीसा कमी करण्यासाठी संगीताची साथ दिली आहे.
नाशिक : सदैव चोऱ्यामाऱ्यांचा तणाव व फिर्यादींचे रडगाणे ऐकत सारे आयुष्य त्यातच घालविणाऱ्या शहर पोलिसांना आता स्मार्टसिटीमुळे "अच्छे दिन' येणार असून, रडगाण्याच्या ठिकाणी सुगम संगीताचे सूर कानी पडणार आहेत. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे'या गीतांच्या सुरातून पोलिस स्वतःवर प्रेम करतील व त्यांचा कामाचा ताण हलका होईल.
स्मार्टसिटीच्या धर्तीवर पोलिस ठाणेही स्मार्ट करण्याचा प्रयत्न
स्मार्टसिटीच्या धर्तीवर पोलिस ठाणे स्मार्ट करण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्तालयांकडून सुरू आहे. त्यानिमित्ताने पोलिस ठाण्यात एलईडी स्क्रीन बसविण्यात आला. नोंदणी संगणकीकृत केल्या. गुन्ह्याची ऑनलाइन माहिती होऊ लागली. आता पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिसांवरील कामाचा तणाव काहीसा कमी करण्यासाठी संगीताची साथ दिली आहे. त्यांनी शहरातील संपूर्ण पोलिस ठाण्यांत म्युझिक सिस्टिम बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस ठाण्यात लहान स्पीकर बसविण्यात येत आहेत. दिवसभर सुमधुर अशा गीतांचे संगीत गुंजणार आहे. पोलिस ठाण्यातील वातावरण संगीतमय होणार आहे. आतापर्यंत शरणपूर रोड येथील जुन्या पोलिस आयुक्तालय इमारतीत असलेल्या कार्यालयात, पंचवटी व आडगाव पोलिस ठाण्यात अशा प्रकारची म्युझिक सिस्टिम बसविण्यात आली आहे. सोमवारी भद्रकाली पोलिस ठाण्यात म्युझिक सिस्टिम आणि त्याचे स्पीकर बसविण्याचे काम दिवसभर सुरू होते.
नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात म्युझीक सिस्टीमचे स्पीकर बसवताना कारागीर
थेट संदेश देण्याची संधी
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या कक्षातून म्युझिक सिस्टिमचे ऑपरेटिंग होणार आहे. त्यामुळे त्यांना आवश्यकता भासल्यास त्यांना पोलिस ठाण्यात विविध कक्षांत असलेल्या कर्मचाऱ्यांशी बसल्या जागेवरून थेट संदेशही साधण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. काही आवश्यक माहिती हवी असल्यास किंवा पोलिस आयुक्तालयांकडून आलेला संदेश कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांना बेल वाजवून कक्षात बोलवावे लागते. आता त्यांनी त्यांच्या कक्षातील म्युझिक सिस्टिमला माइक सिस्टिम जोडली तर त्यांना माइकद्वारे स्पीकरच्या माध्यमातून थेट कर्मचाऱ्यांना संदेश देता येणार आहे.