
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेला अयोध्या निकालाचे मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त स्वागत केले. "मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिन्दी हैं, हम वतन हैं, हिन्दोस्तॉं हमारा' वाक्याला हिंदू-मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्षात उतविल्याचे चित्र जुने नाशिक भागात बघावयास मिळाले. त्या आशयाचा फलकही मुस्लिम बांधवांनी दूधबाजार परिसरात लावला होता.
नाशिक : राममंदिर आणि बाबरी मशिदीबाबतच्या निकालाची सर्वांना उत्सुकता होती. दुसरीकडे सामान्य नागरिकांमध्ये निकालास घेऊन भीतीचे वातावरणही होते. निकालानंतर कोणतीही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी पोलिसांनीही दक्षता घेत कडक बंदोबस्त तैनात केला होता. त्याचप्रमाणे दोन्ही समाजबांधव आणि शांतता समितीची बैठक घेऊन पोलिस आयुक्तांनी शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले होते. पोलिसांचे लक्ष भद्रकाली अर्थात जुने नाशिक भागाकडे लागून होते; परंतु येथील दोन्ही समाजांच्या बांधवांनी आपसात सामंजस्य दाखविण्याचे काम केल्याचे शनिवारी दिसून आले. निकालानंतरही त्याचे पडसाद येथील दैनंदिन कामांवर पडले नाहीत. कुठल्याही प्रकारच्या वादविवादाचे वातावरण झाले नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दूधबाजार परिसरात हिंदू-मुस्लिम बांधवांकडून निकालानंतर एकतेचा संदेश
मुस्लिम बांधवांच्या बज्मे हमदानशा कमिटीतर्फे तर निकालाच्या आदल्या दिवशी दूधबाजार येथे "मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना, हिन्दी हैं, हम वतन हैं, हिन्दोस्तॉं हमारा', "सुप्रीम कोर्ट का फैसला हमे मंजुर है, हम भारतीय हैं, आने वाले फैसले का हम सन्मान करेंगे' अशा आयशाचा फलक लावून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. देश खऱ्या अर्थाने सार्वभौम झाल्याचे आजच्या वातावरणावरून दिसून आल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.
प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. सर्वांनी शांतात राखावी, सर्व बांधव एक आहेत. धार्मिक एकता समाजाची खरी ताकद आहे. एकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. - हिसामोद्दीन खतीब, शहर-ए-खतीब
कुठला धर्म मनात कटुता ठेवण्यास शिकवत नाही. आलेल्या निकालाचा सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे. त्यानुसार निकाल आम्ही मान्य करतो. तसेच इतरांनी शांतता राखावी. - जाकिर अन्सारी, बज्मे हमदानशा कमिटीचे पदाधिकारी