मुस्लिम विधवा बहिणीसाठी हिंदू भावंडांचा टाहो!

Nathabai
Nathabai

जळगाव - जातीय तेढ व धार्मिक विद्वेषाने समाज पोळून निघत असताना हिंदू- मुस्लिम धर्मातील अनोख्या ऋणानुबंधाचे उदाहरण नुकतेच अनुभवायला मिळाले. पाथरी-सामनेर येथील मुस्लिम वृद्धेचे नुकतेच निधन झाले, पण तिच्या निधनावर धाय मोकलून रडणारे मुस्लिम कुटुंबीय नव्हे; तर गावातीलच राजपूत कुटुंब. तरुणपणीच वैधव्य आलेल्या या वृद्धेला राजपूत कुटुंबाने आधार दिला, सांभाळ केल्याची माहितीही यानिमित्ताने समोर आली. आणि राखीच्या अतूट धाग्याचे महत्त्वही अधोरेखित झाले. 

जळगावपासून जवळच पाथरी-सामनेर येथील शेतकरी दामूसिंह पाटील आणि अमीर पटेल यांची अतूट मैत्री. दारूचे व्यसन जडल्याने दामूसिंग यांची चारही मुले, एक मुलगी लहानपणापासूनच अमीर यांच्या घरात वाढली. पटेल यांना नथाबाई व गेणूबाई अशा दोन मुली. अमीर पटेल व दामूसिंह यांच्या निधनानंतरही पटेल-राजपूत कुटुंबाचे संबंध सलोख्याचे राहिले. अमीर यांची पत्नी प्यारीबाईला दामूसिंह यांचा मुलगा करमसिंहने मांडी दिल्यावर त्यांचे प्राणात्मण झाले. 

पटेलांच्या मुलीस  वैधव्य
अमीर यांच्या दोन्ही मुलींचे (नथाबाई, गेणूबाई) विवाह झाल्यानंतरही दुसऱ्या पिढीत भाऊ- बहिणीचे नाते जोपासले. लग्नानंतर नथाबाईंना वैधव्य नशिबी आले. भाऊ नाही, आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने विधवा बहिणीच्या सांभाळण्याची जबाबदारी चारही राजपूत बंधूंवर आली. धरमसिंह, करमसिंह, विक्रमसिंह, रूपसिंह अशा चौघा भावंडांमध्ये नथाबाई परतल्या. कुठलीही धार्मिक दरी न ठेवता नथाबाई चारही भावंडांत रमल्या त्या अखेरच्या श्‍वासापर्यंत...

नातू- पणतूही खेळवले
धरमसिंह-करमसिंह चौघा भावंडांमध्ये लहान. त्यावेळी नथाबाईने त्यांना अंगावर खेळवल्याने बहिणीची माया चौघांनी कधी कमी होऊ दिली नाही. भावांचे लग्न होऊन त्यांना पोरं झाली. त्या पोरांना व आता त्यांच्याही पुढच्या पिढीस नथाबाईंनी खेळवले. अलीकडे करमसिंह यांचा मुलगा सुमेरसिंह यांच्या पोलिस लाईनीतील कुटुंबात त्या अनेक वर्षांपासून राहत होत्या. आठ दिवसांपूर्वी लग्नासाठी मुलीकडे म्हसावद येथे आल्या. दूषित पाण्यामुळे अल्प आजाराने त्यांचे गुरुवारी (ता. ६) निधन झाले. मुस्लिम धर्मानुसार त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. यावेळी चारही राजपूत भावंडे बहिणीच्या अंत्यदर्शनाला धाय मोकलून रडत होती.

आजीचे आशीर्वाद सदैव पाठीशी 
वडिलांचा सांभाळ नथाआजीने केला.. नंतर माझा व माझ्यानंतर माझ्या लहान मुलांचे संगोपनही नथाआजीने केले.. जन्म देणाऱ्या आईप्रमाणेच सांभाळले. चार भावांचे कुटुंब आणि त्यांची मुले व नातवांमध्ये रेशीमगाठीचे काम नथाआजीने चोखपणे बजावले. आई, तिन्ही काकू, वहिनी आणि आम्हा भावंडांच्या बायका अशा मोठ्या परिवारात कधी वाद झाल्याचं उदाहरण नाही. नथाआजीचं जाणं आम्हा कुटुंबीयांना चटका लावून गेलं, अशी भावस्पर्शी भावना सुमेरसिंग पाटील यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com