मुथूट फायनान्स दरोडा प्रकरण; मुख्य सूत्रधाराला अखेर अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

गुन्हा घडल्यापासून पोलिस कसोशीने तपास करीत होते. एकाला अटक केली असून पाच संशयितही लवकरच अटक होतील. त्यादृष्टीने अजूनही काही पथके परराज्यात तळ ठोकून आहेत. 
- विश्‍वास नांगरे पाटील, नाशिक पोलिस आयुक्त

नाशिक - मुथूट फायनान्सवरील दरोडा आणि खुनाचा छडा लावताना नाशिक पोलिसांनी दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला सुरतमधून अटक केली आहे. पाच संशयितांच्या मागावरील पोलिसांचे पथक परराज्यात तळ ठोकून आहे. 

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जून रोजी आशावाडी येथे सापडलेल्या दुचाकींच्या वायरलूपवरील क्रमांकाच्या आधारे पोलिस संशयितापर्यंत पोचले आणि गुन्ह्याची उकल झाली. गुन्ह्यातील संशयित हे गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील आहेत.

पोलिसांनी दरोड्याचा मुख्य सूत्रधार जितेंद्र विजय बहादूर सिंग राजपूत (३४) यास सुरतमधून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. गुन्ह्यातील संशयितांची नावे आकाश सिंग राजपूत, परमेंदर सिंग (रा. उत्तर प्रदेश), पप्पू ऊर्फ अनुज साहू (रा. पश्‍चिम बंगाल), सुभाष गौड (रा. नाशिक, मूळ रा. उत्तर प्रदेश), गुरू (बिहार) अशी आहेत. अयातील पप्पू ऊर्फ अनुज साहू हा तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचेही तपासातून समोर आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muthoot Finance Robber Case Criminal Arrested