माझ्या बापावर गुन्हा दाखल करा; अभ्यास करू देत नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

माझ्या बापावर गुन्हा दाखल करा, मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, अशी मागणी एका मुलाने चक्क पोलिस स्थानकामध्ये येऊन केली आहे. यावेळी संवेदनशील मनाचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी त्याची विचारपूस करून त्याला नवीन कपडे दिले व पालकांना बोलावून समज दिली.

जळगाव : माझ्या बापावर गुन्हा दाखल करा, मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, अशी मागणी एका मुलाने चक्क पोलिस स्थानकामध्ये येऊन केली आहे. यावेळी संवेदनशील मनाचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी त्याची विचारपूस करून त्याला नवीन कपडे दिले व पालकांना बोलावून समज दिली.

मुलं अभ्यास करीत नाही, अशी सर्वसामान्य पालकांची ओरड असते. मात्र जामनेरातील मुलाने केलेली ही तक्रार पाहून सर्वचजण अचंबित झाले आहेत. जामनेरमधील भुसावळ रोड भागात राहत असलेल्या कुटुंबातील हा 12 वर्षांचा मुलगा असून आई शेतात मजुरी करते व वडील मिस्त्री काम करतात. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर पाऊस सुरू असताना हा मुलगा हाफ चड्डी व बनियानवर ओला झालेल्या स्थितीत पोलिस ठाण्यात आला व बापावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागला.

पोलिस निरीक्षक इंगळे, पोलिस कर्मचारी नीलेश घुगे यांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली. दुकानात नेले. तेथून कपडे घेऊन दिले, तो म्हणाला, सँडलसुद्धा पाहिजे. अभ्यास करण्याची इच्छा आहे मात्र बाप टीव्ही पाहतो, अभ्यास करू देत नाही, मारतो. हे ऐकून इंगळे यांनी त्याच्या आई, वडिलांना बोलाविले व समज दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My dad wont study file a crime says boy in Police station