वरखेडे बॅरेजला 'नाबार्ड' चा अर्थपुरवठा

दीपक कच्छवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

चाळीसगाव व भडगाव तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या वरखेडे-लोंढे बॅरेजचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी राष्ट्रीय शेती व ग्रामविकास  बँकेकडून (नाबार्ड) अर्थपुरवठा होणार आहे. यासंदर्भात आज 'नाबार्ड' च्या जनरल मॅनेजरसह इतर अधिकार्यानी पहाणी केली. यासाठी, आमदार उन्मेष पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): चाळीसगाव व भडगाव तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या वरखेडे-लोंढे बॅरेजचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी राष्ट्रीय शेती व ग्रामविकास  बँकेकडून (नाबार्ड) अर्थपुरवठा होणार आहे. यासंदर्भात आज 'नाबार्ड' च्या जनरल मॅनेजरसह इतर अधिकार्यानी पहाणी केली. यासाठी, आमदार उन्मेष पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या कामाला 2013 पासून सुरवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील महाराष्ट्रातील बळीराजा संजीवनी योजनेत 108 व प्रधानमंत्री सिंचन प्रकल्प योजनेतील 26 प्रकल्प मे 2019 पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली होती. त्यात, वरखेडे-लोंढे बॅरेजचाही समावेश आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने कामे करतांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पावसाळा संपल्यानंतर प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर केले जाईल. या कामासाठी वित्त विभागाची परवानगी यापूर्वीच मिळाली होती. ज्यात 526.64 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा समावेश आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवल्याने या कामाला गती मिळाली आहे. खासदार ए. टी. पाटील यांनीही दिल्लीत मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली होती.

हा प्रकल्प आता मे 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ठ आहे. या प्रक्लपाला तापी महामंडळाचे डी.एस.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

नाबार्ड करणार कर्जपुरवठा
वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पावर आज नुकतीच नाबार्डचे जनरल मॅनेजर टी. लक्ष्मीनारायण जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता व नाबार्डचे तांत्रिक सल्लागार आर .एस. चौधरी आज दुपारी प्रकल्पाची पहाणी केली. या प्रक्लप 526.26 कोटीचा असुन त्यावर आतापर्यंत 108 कोटीचा निधी खर्च झाला आहे. यापैकी राहीलेल्या 418.26 कोटीला नाबार्ड कर्जपुरवठा करणार असल्याची माहिती अधिकृत  सूत्रांनी दिली.यावेळी अधिक्षक अभियंता अनंत मोरे, कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, या प्रकाल्पाचे कंत्राटदार प्रकाश पाटील, साहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटील, निवृत्त डेप्युटी इंजिनियर श्री.पंडीत आदी उपस्थित होते.

कालव्यासाठीही निधी
यादरम्यान, नाबार्ड च्या अधिकार्यानी वरखेडे- लोंढे बॅरेजचा कालवा भोरस गावाकडून जाणार असल्याने भोरसला भेट देवुन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी पंचायत समितीचे सदस्य सुनिल पाटील, सरपंच पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बॅरेजच्या कालव्यासाठीही नाबार्ड कडुन निधी देण्यासाठी अधिकाऱयांनी हिरवा कंदील दिला.त्यामुळे, हा प्रकल्प व कालवा लवकरात लवकर पूर्ण करावी आशी मागणी भोरस येथील ग्रामस्थांनी यावेळी केली.

दरवाजाची कामे युद्धपातळीवर सुरू
वरखेडे- लोंढे बॅरेज प्रक्लपाला 13 वक्राकार दरवाजे आहेत. सध्या हे दरवाजे बनविण्याचे काम रात्र दिवस सुरू आहे. एका वक्राकार दरवाजाची 12 मीटर लांबी तर 15 मीटर उंची आहे.या ठीकाणी पावसाळा संपताच नदिपात्रातील कामाची ही जय्यत तयारी करून हे काम  सध्या रात्र दिवस सुरू आहे. 

हा प्रकल्प एप्रिल 2019 पर्यंत पुर्ण होईल. पुढील वर्षातील पावसाळ्याचे पाणी या प्रकल्पात अडविले जाईल. सुरवातीपासुनच या कामाला निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे- उन्मेष पाटील आमदार चाळीसगाव

Web Title: NABARD finance to Warkhede Barrage