‘नमो’ उद्यान विरुद्ध सावरकर पार्क

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नाशिक - अंबड पोलिस ठाण्याजवळ असलेल्या महापालिकेच्या पेलिकन पार्कचे ‘नमो’ उद्यान असे नामकरण करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या आमदार व नगरसेवकांकडून सुरू आहे. यात आता शिवसेनेनेही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पार्क असे नामकरण करण्याची मागणी करून नवा वाद निर्माण केला आहे. शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी व कामगार सेनेच्या अध्यक्षपदाच्या वादात भाजपने उडी घेऊन नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करून डिवचल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने ‘नमो’ उद्यानाला विरोध करून जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

अनेक वर्षांपासून सिडकोतील पेलिकन पार्क विकासाविना पडून आहे. आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आमदार निधी, तसेच शासनाकडून निधी मंजूर करून त्या जागेवर उद्यान उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यासाठी उद्यानाचे ‘नमो’ उद्यान असे नामकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण, शिवसेनेच्या सिडको विभागाकडून भाजप आमदार व नगरसेवकांच्या भूमिकेला विरोध करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या नावाने राजकारण करणारे भाजप सरकार ‘भारतरत्न’ देऊ शकत नाही. किमान उद्यानाला त्यांचे नाव तरी द्यावे, अशी भावना नाशिककरांची असल्याचे निवेदन अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना देण्यात आले. पेलिकन पार्कचे ‘नमो’ उद्यानऐवजी सावरकर पार्क असे नामकरण करावे, अशी मागणी रवी पाटील, अभय दिघे, संतोष बच्छाव, सचिन धांडगे, पृथ्वीराज अंडे, नितीन परदेशी, समाधान बोडके, सचिन जाधव, इम्रान शेख, विशाल इल्ले, सागर वाघ, आशिष रणशौर्य, दीपक थोरात आदींनी केली आहे.

शिवसेनेची भाजपवर कुरघोडी
शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून सध्या वाद सुरू आहे. परस्पर नवनिर्वाचित नगरसेवकांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर शिवसेनेंतर्गत वाद उफाळून आले होते. भाजपने त्या वादात उडी घेत स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी नगरसेवक प्रवीण तिदमे यांचा अध्यक्ष झाल्याबद्दल सत्कार करून अंतर्गत वादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या प्रयत्नाला उत्तर म्हणून आता पेलिकन पार्कच्या नामकरणाचे हत्यार शिवसेनेने उपसल्याचे बोलले जात आहे.

Web Title: 'Namo' Garden Against Savarkar Park